

साहित्याने समाजाला दिशा देण्याचे काम करावे
किरण माने; प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलनाचा उत्साहात
सातारा, ता. ४ : साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडून परिवर्तनाची दिशा दाखविणारे प्रभावी माध्यम आहे. वाचनातून माणूस समृद्ध होतो आणि विचारांची व्याप्ती वाढते. त्यामुळे नव्या पिढीने मोबाईलच्या आहारी न जाता पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहन अभिनेते किरण माने यांनी केले.
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने आयोजित प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण माने बोलत होते. साहित्यिक ॲड. शंकर निकम अध्यक्षस्थानी होते.
किरण माने म्हणाले, ‘‘वाचन माणसाला केवळ ज्ञानी बनवत नाही, तर संवेदनशीलही बनवते. आजच्या काळात माहिती सहज उपलब्ध आहे. मात्र, माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. पुस्तकांमधून माणूस विचार करायला शिकतो. साहित्य समाजातील वास्तव समोर आणते आणि चुकीच्या गोष्टींविरोधात प्रश्न विचारण्याचे बळ देते. त्यामुळे साहित्यिकांनी आणि वाचकांनी समाजाशी आपली नाळ कायम जोडून ठेवली पाहिजे. आजच्या मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये साहित्याचे स्वरूप बदलत आहे. या बदलांकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यातील सकारात्मक शक्यता शोधल्या पाहिजेत. मात्र, मनोरंजनाच्या नावाखाली समाजातील संवेदनशीलता आणि साहित्यिक मूल्ये कमी होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.’’
ॲड. शंकर निकम म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनांची खरी गरज आज पूर्वीपेक्षा अधिक आहे. समाजात वेगाने बदल होत असताना माणसाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, अस्वस्थता आणि संघर्ष साहित्याने टिपले पाहिजेत. साहित्य हे समाजाचे आरसे असते. मात्र, केवळ वास्तव दाखविणे पुरेसे नाही, तर त्या वास्तवावर विचार करण्याची प्रेरणाही साहित्याने दिली पाहिजे. मतभेद असले तरी संवादाची परंपरा जिवंत ठेवणे ही साहित्य आणि संस्कृतीची जबाबदारी आहे.’’ सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र माने यांनी आभार मानले.
या संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण, स्वागताध्यक्ष डॉ. अविनाश पोळ, स्वागत समिती अध्यक्ष प्रा. श्रीधर साळुंखे, उपाध्यक्ष डी. एल. थोरात, कार्यवाह वैदेही कुलकर्णी, डी. एल. मोहिते, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. अशोकराव भोईटे, गौतम भोसले, डॉ. संदीप श्रोत्री, बाबूराव शिंदे यांच्यासह साहित्यिक, कवी, शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. संमेलनात ‘मराठी मालिकांमधून साहित्य मूल्य उणावते आहे का?’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन रंगले. विविध कवींनी सादर केलेल्या कविता आणि साहित्यिक चर्चांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
55283
सातारा ः संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना किरण माने, त्यावेळी व्यासपीठावर डॉ. राजेंद्र माने, ॲड. शंकर निकम, रवींद्र भारती-झुटिंग, श्रीधर साळुंखे. (नरेंद्र जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.