

पान १४ साठी
दुष्काळात जनावरांचे पोषण, विषबाधेपासून संरक्षण
-----------------
डॉ. सोपान दिवटे, डॉ. नाना सोनवणे
-----------------
दुष्काळजन्य स्थितीमध्ये हिरवा चारा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा वेळी वाळलेला पाला, पिकांचे अवशेष आणि इतर पर्यायी चाऱ्यांचा वापर चाऱ्यासाठी केला जातो. मात्र, काही पर्यायी वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे घातक घटक (प्रतिपोषक घटक) असतात. हे घटक जनावरांच्या शरीरात अन्नद्रव्यांचे पचन व शोषण होण्यात अडथळे निर्माण करतात. काही घटकांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. अशावेळी जनावर अचानक गंभीर आजाराला बळी पडण्याची किंवा दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे टंचाईच्या काळात पर्यायी चाऱ्याचा वापर करताना त्यातील घातक घटक, त्यांचे परिणाम आणि सुरक्षित वापराच्या पद्धती समजून घेणे आवश्यक आहे.
------------------
पर्यायी चाऱ्यातील घातक घटक आणि सुरक्षित वापर ः
१) ज्वारीचे कोवळे फुटवे किंवा लहान कोंब ः
कोवळ्या ज्वारीत हायड्रोसायनिक आम्ल (HCN किंवा प्रुसिक आम्ल) असू शकते. हा घटक पशुधनाच्या शरीरातील पेशींना ऑक्सिजन उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे जनावरांना धाप लागणे, अस्वस्थता आणि गंभीर परिस्थितीत जनावर अचानक दगावणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
घ्यावयाची काळजी ः
पाण्याचा ताण पडलेली किंवा कोवळी ज्वारी पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय चारा म्हणून वापरू नये. योग्य परिपक्वतेनंतरच ज्वारीचा चारा वापरावा. वाळवणे किंवा मुरघास करणे यामुळे विषारी घटक कमी होण्यास मदत होते; मात्र त्यामुळे चारा पूर्णपणे सुरक्षित होतोच असे नाही.
----------
१) उसाचे वाढे (सतत जास्त वापर) ः
- उसाच्या वाढ्यात ऑक्झॅलेट्स असतात. त्यांचे प्रमाण आणि आहारातील एकूण कॅल्शिअम यांचा विचार न करता जास्त प्रमाणात आहारात समावेश केल्यास कॅल्शिअमच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. सतत आहारात उसाचे वाढे वापरल्यास रक्तातील कॅल्शिअम कमी होऊन जनावर खाली बसते. मूत्रपिंडांवरही परिणाम होण्याची शक्यता असते.
काळजी ः
उसाचे वाढे हा एकूण आहाराचा मर्यादित भाग असावा. त्यासोबत योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे. अतिरिक्त कॅल्शियम, चुना किंवा इतर पूरक घटक पशुवैद्यकीय सल्ल्यानेच वापरावेत.
२) सुबाभूळ किंवा शेवरी ः
सुबाभळीच्या पानांमध्ये मिमोशिन हा घटक असतो. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास जनावराचे केस गळणे, लाळ गळणे, वाढ खुंटणे आणि थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर परिणाम होणे अशा समस्या दिसून येतात.
काळजी ः
सुबाभळीचा पाला एकूण आहाराच्या २० ते ३० टक्के पेक्षा जास्त देऊ नये. इतर चाऱ्यांसोबत मर्यादित प्रमाणात द्यावा. शेळ्या-मेंढ्यांची पाला पचवण्याची क्षमता तुलनेने चांगली असली तरी त्यांनाही संतुलित आहार आवश्यक आहे.
३) सरकी पेंड ः
सरकीमध्ये गॉसिपॉल हा घटक असतो. त्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरांच्या यकृत, हृदय आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपाताचा धोका असतो. त्यामुळे लहान वासरे आणि गाभण जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.
काळजी ः
लहान वासरांना सरकी पेंड देऊ नये. गॉसिपॉलचा प्रभाव कमी करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने पूरक घटकांचा वापर करावा.
४) वाळलेला पाला आणि झाडांचे अवशेष (कडुनिंब, शिरीष) ः
काही झाडांच्या पाल्यामध्ये टॅनिन्ससारखे घटक असतात. त्यांचे प्रमाण जास्त असल्यास चारा चवीला कडवट लागतो. त्यांचे प्रमाण जास्त असल्यास चाऱ्याची रुचकरता आणि प्रथिनांचे पचन कमी होऊ शकते. परिणामी जनावरांचे वजन वेगाने घटण्याची शक्यता असते.
काळजी ः
चारा देण्यापूर्वी सुरक्षित असल्याची खात्री करावी. पाला २४ तास उन्हामध्ये वाळवून, कुट्टी करून त्यावर गूळ व गुळाचे पाणी फवारावे. त्यानंतर इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावा. गूळ किंवा गुळाचे पाणी वापरल्याने चारा रुचकर होतो. मात्र त्यामुळे विषारी घटक निष्क्रिय होतातच असे नाही.
----------------------
सुक्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याच्या पद्धती ः
दुष्काळात उपलब्ध असलेल्या सुक्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी चाऱ्याची योग्य निवड, प्रक्रिया आणि संतुलित आहार नियोजन महत्त्वाचे आहे.
१) सुक्या चाऱ्यावर ४ टक्के युरिया प्रक्रिया ः
सुक्या चाऱ्यावर योग्य पद्धतीने केलेल्या युरिया प्रक्रिया केल्यामुळे त्याची पाचकता वाढते. आणि जनावरे आवडीने खातात. प्रक्रिया करण्यासाठी पाण्यात युरिया विरघळवून चाऱ्याच्या थरावर फवारावा आणि ताडपत्रीने २१ दिवस घट्ट बांधून बंद करावा. वापरण्यापूर्वी अर्धा तास हवेवर पसरवून त्यानंतर जनावरांना द्यावा. या प्रक्रियेत युरियाचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण, चाऱ्याची आर्द्रता, हवाबंद साठवण आणि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी यांचे काटेकोर नियोजन आवश्यक असते.
काळजी ः युरिया हा जनावरांसाठी अयोग्य प्रमाणात दिल्यास विषारी ठरू शकतो. त्यामुळे प्रक्रिया केलेला चारा तयार करण्याची आणि जनावरांना देण्याची पद्धत पशुवैद्यकीय किंवा पशूपोषण तज्ज्ञांकडून समजून घ्यावी. प्रक्रिया अपूर्ण असलेला चारा किंवा युरियाचे द्रावण थेट जनावरांना देऊ नये.
२) गूळ आणि खनिज मिश्रण ः वाळलेला पाला किंवा चारा जनावरे आवडीने खात नाहीत. ही प्रक्रिया केल्यास चाऱ्याची चव आणि पौष्टिकता सुधारते. वाळलेल्या चाऱ्याची रुचकरता वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात गूळ किंवा गुळाचे पाणी वापरता येते. जनावरांच्या गरजेनुसार खनिज मिश्रण द्यावे.
३) बायपास प्रथिने आणि बायपास फॅट ः
दुभत्या जनावरांच्या आहारात बायपास प्रथिने आणि बायपास फॅटचा योग्य वापर केल्यास दूध उत्पादन आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होऊ शकते. हे घटक कोठीपोटातील विघटनापासून काही प्रमाणात सुरक्षित राहून पुढील पचनसंस्थेत उपयोगी पडतात. बायपास फॅट आहारातून रोज १०० ते १५० ग्रॅम प्रमाणात दिल्यास दुष्काळाच्या स्थितीत जनावरांचे वजन घटत नाही आणि दुधातील फॅटचे प्रमाण टिकून राहते.
४) चाटण विटा ः
युरिया, मोलॅसिस, खनिज मिश्रण आणि इतर घटकांपासून तयार केलेल्या चाटण विटांचा वापर जनावरांच्या पोषणासाठी करता येतो. यामुळे आहारातील नायट्रोजन आणि खनिजांचा पुरवठा होण्यास मदत होऊ शकते. युरिया, गूळ, खनिज मिश्रण, मीठ आणि सिमेंट यांपासून बनवलेल्या विटा गव्हाणीत टांगून ठेवाव्यात. जनावरांनी तो चाटल्यामुळे लाळेतील पाचक रस वाढतात आणि पचनक्रिया सुधारते.
काळजी ः
युरियाचे अयोग्य सेवन झाल्यास गंभीर विषबाधा होऊ शकते. त्यामुळे प्रमाणित चाटण विटाच वापराव्यात. त्यांची उपलब्धता, वापरण्याची पद्धत आणि जनावरांना द्यावयाचे प्रमाण याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून मिश्रण तयार करून वापरणे टाळावे.
शेळ्या-मेंढ्यांचे आहार व्यवस्थापन ः
दुष्काळात शेळ्या-मेंढ्यांसाठी झाडपाला हा चाऱ्याचा महत्त्वाचा पर्याय ठरतो. मात्र, वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्याची शाश्वती नसते. अशा स्थितीत सुबाभूळ, शेवरी, कडुनिंब, अंजन, पिंपळ, वड आणि चिंचेचा पाला शेळ्यांसाठी उपयुक्त ठरतो. हा पाला प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यासाठी पाला गोळा करून तो सावलीत वाळवून ठेवा. त्याची कुट्टी करून पेंढा, भुसा किंवा इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावा. सोयाबीनचे भुसे, हरभऱ्याचे कुटार, गव्हाचा भुसा आणि मक्याचे अवशेष यांचाही योग्य वापर करता येतो. मात्र, याची पाचकता वाढवण्यासाठी त्यावर १ टक्के युरिया-गुळाचे पाणी फवारावे. केवळ सुक्या चाऱ्यावर शेळ्या तग धरून राहू शकत नाहीत. यासाठी प्रति प्रौढ शेळीला शरीराच्या गरजेनुसार १५० ते २५० ग्रॅम खुराक जसे की भरडलेली मका, ज्वारी, बाजरी किंवा कोंडा देणे अत्यंत गरजेचे आहे.
---------------
डॉ. सोपान दिवटे, (पशुवैद्यकीय अधिकारी) ९६५७८५३७३८
(भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पश्चिम विभागीय संदर्भिय पशू रोग निदान प्रयोगशाळा/ रोग अन्वेषण विभाग, पुणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.