
‘मेमू’तील भार ‘एक्स्प्रेस’वर
पुणे - दौंड ते पुणे (Daund to Pune) ‘मेमू’ (Mainline Electric Multiple Unit) च्या फेऱ्या कमी असल्याने तसेच दौंड ते लोणावळा थेट मेमू (Memu) नसल्याने रोज सुमारे वीस हजार प्रवाशांना एक्स्प्रेस (Express) गाडीतून प्रवास (Journey) करावा लागत आहे. ही बाब दंडात्मक तर आहेच, शिवाय यामुळे एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांवर अन्यायकारकदेखील आहे. ‘मेमू’तील या प्रवाशांमुळे एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
दौंड ते पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जवळपास १० ते १२ हजार आहे. सध्या दिवसभरात दौंडहून पुण्यासाठी तीन मेमू धावतात. पूर्वी ही संख्या चार होती. दौंडशिवाय केडगाव, उरुळी कांचन या स्थानकांवरूनदेखील पुण्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्यासुद्धा भरपूर आहे. या स्थानकांवरचे बहुतांश प्रवासी एक्स्प्रेस गाड्यांचा आधार घेत पुणे गाठतात. तसेच संध्याकाळीदेखील एक्स्प्रेस गाडीनेच घर गाठतात. तर काही प्रवासी ‘मेमू’नेच प्रवास करतात. हे सर्व प्रवासी पुणे स्थानकांवर दाखल झाल्यानंतर धावत पळत पुणे-लोणावळा लोकल पडतात. जर लोकल चुकली तर पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही एक्स्प्रेस गाडीतूनच पुढचा प्रवास करतात. त्यामुळे आता दौंड-लोणावळा धावणारी मेमू सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.
२२५ - पुणे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे
३० ते ३२ - दौंड ते पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे
१ लाख ते १.२० लाख - पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्याची संख्या
१८ ते २० हजार - मेमूचे प्रवासी
दौंड-लोणावळा मेमू सुरू झाल्यास...
दौंड ते लोणावळादरम्यान धावणारी थेट मेमू सुरू झाली तर प्रवाशांच्यादृष्टीने खूप सोयीचे होईल. प्रवाशांची पुणे स्थानकावर गाडी बदलण्याच्या त्रासापासून सुटका होईल. शिवाय ‘मेमू’तील प्रवाशांना एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करावा लागणार नाही. परिणामी, एक्स्प्रेस गाडीवरचा ताणही काम होईल. गाडीतील सीटवरून प्रवाशांचे होणारे वाददेखील होणार नाहीत.
दौंड ते लोणावळा थेट मेमूचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविला आहे. याबाबत आम्ही सकारात्मक विचार करीत आहोत. प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही, त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य नाही.
- ब्रिजेशकुमार सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे
अनेक पासधारक एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करतात हे खरे आहे. त्याचा आरक्षित डब्यातील प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेमूच्या फेऱ्या वाढवाव्यात, तसेच दौंड-लोणावळा थेट मेमूसेवा सुरू करावी.
- विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे प्रवासी संघ
Web Title: Load In The Memu Local Is On The Express
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..