

पुणे, ता. ११ ः ‘‘प्रत्येक समस्येवर प्रयोगशाळेत विकसित केलेले तंत्रज्ञान, हा उपाय असू शकत नाही. स्थानिक गरजांनुसार विकेंद्रित प्रयोग आणि तळागाळातील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, ही काळाची गरज आहे. किफायती नवसंकल्पनांच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे असून, त्यासाठी नवसर्जकांना जोडणारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठे तयार व्हावीत,’’ अशी अपेक्षा ‘हनी बी नेटवर्क’चे संस्थापक आणि नवसंकल्पनांचे स्फूर्तिदाते डॉ. अनिल गुप्ता यांनी रविवारी व्यक्त केली.
‘सकाळ’चे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांची १२९ वी जयंती व ‘साप्ताहिक सकाळ’च्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. गुप्ता यांनी ‘शोध नवसंकल्पनांचा’ या विषयावर बोलताना भारतातील नवसर्जनाची क्षमता, संशोधनाची दिशा, स्थानिक ज्ञानाचे महत्त्व आणि नवसंकल्पनांना आर्थिक मूल्य मिळवून देण्याची गरज, याविषयी मांडणी केली. याप्रसंगी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘‘भारतात नवकल्पनांची कमतरता नाही; मात्र सामान्य माणसाच्या कल्पकतेला वैज्ञानिक संशोधन, आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठेशी जोडणारी व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. शेतकरी, कारागीर आणि सामान्य नागरिकांकडील कल्पनांचा विचार औपचारिक संशोधन व्यवस्थेत केला जात नाही. या कल्पना शोधून त्यांचे मूल्यमापन करणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, ही नवसंकल्पनांच्या क्षेत्रातील महत्त्वाची गरज आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्राधान्यक्रम यांच्यात ताळमेळ असणे आवश्यक आहे.’’
‘‘गावागावांत आणि कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या जपलेले वनस्पती व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपयोगासंबंधीचे ज्ञान अद्याप पुरेशा प्रमाणात नोंदवले गेलेले नाही. या ज्ञानाचे संकलन, शास्त्रीय पडताळणी आणि मूल्यमापन करण्याची गरज आहे. शेतीतून किंवा स्वयंपाकघरातून टाकून दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उपयोगांचा अभ्यास केल्यास नव्या उत्पादनांची निर्मिती आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत विकसित होऊ शकतात’’, असेही त्यांनी सांगितले. फडणीस यांनी प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
----
कथा स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
‘साप्ताहिक सकाळ’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कथा स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिकांनी गौरवण्यात आले. मनिषा कडव (ठाणे) यांना प्रथम क्रमांकाचे, पुरुषोत्तम रामदासी (पुणे) यांना द्वितीय क्रमांकाचे, पार्थ पतंगे (ठाणे) यांना तृतीय क्रमांकाचे, मधुरा गोसावी (मुंबई) यांना चौथ्या क्रमांकाचे आणि नम्रता हुंबे (धाराशिव) यांना पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच, प्रणिता खांडकर (डोंबिवली), डॉ. पल्लवी जाजु (बीड), प्राची तडाखे (कोल्हापूर), अपर्णा परदेशी (नाशिक) आणि किरण गेडाम (कारंजा लाड, वाशीम यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी गौरवण्यात आले. या वेळी ‘साप्ताहिक सकाळ’च्या कथा विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.
----
डॉ. अनिल गुप्ता म्हणाले ः
- नवसंशोधकांना पैशांऐवजी तुमचे ‘सामाजिक भांडवल’ द्या
- प्रत्येक व्यक्तीमध्ये नवसर्जनाची क्षमता; त्या क्षमतेला योग्य संधी आवश्यक
- मुलांना तयार उत्तरे देण्याऐवजी त्यांच्या कल्पना ऐकून घेणे महत्त्वाचे
- कुतूहल कायम ठेवणे, हेच ‘जिवंतपणाचे’ लक्षण
- शांत झोप हेच समाधानी जीवनाचे गमक
फोटो ः 57145, 57138, 57141, 57140, 7139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.