अव्वल शाळेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

अव्वल शाळेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

Published on

गुनाट, ता. २७ ः ‘‘देशासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विद्यार्थी घडविण्याची क्षमता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे. शिरूर तालुक्यातील शिक्षक त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, ही कौतुकास्पद बाब. शिक्षकांच्या या अपार मेहनतीला ज्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीची साथ लाभली आहे, त्या शाळा आज गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल दर्जाच्या आहेत. त्यामुळे अव्वल दर्जाच्या जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थी घडविण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.
करडे (ता. शिरूर) येथील गुणवत्तेच्या बाबतीत अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या व शासकीय पुरस्कार प्राप्त पाचर्णे वस्ती येथील शाळेला पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले संस्कार, शिक्षण आणि गुणवत्ता यांचा त्रिवेणी संगम; हस्ताक्षर, सामाजिक-राजकीय क्षेत्रातील घडामोडींचे ज्ञान, वकृत्व व हजरजबाबीपणा; तर शाळेचा परिसर, त्यातील फळझाडे, फुलझाडे, परसबाग, सेंद्रिय शेती, रेन हार्वेस्टिंग, शिवसृष्टी, स्वच्छता अशी परिपूर्ण शाळा पाहुन ते भारावून गेले. या वेळी गटविकास अधिकारी महेश डोके, मुख्याध्यापक संभाजी जगताप, बेबीनंदा सकट, दत्तात्रेय सकट, कैलास पाचर्णे, सादिक तांबोळी, निलेश जाधव, मंदा श्रीमंत, शुभांगी इसवे आदी उपस्थित होते.

शाळेसाठी ग्रामस्थांचे असलेले मोलाचे सहकार्य, लोकवर्गणीतून जमा झालेला वीस लाखांचा निधी, कंपन्यांच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झालेल्या भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलेले शिक्षक यांमुळे शासन स्तरावर शाळेला मिळालेले दोन पुरस्कार हे त्याचेच द्योतक आहे. ग्रामस्थ व शिक्षकांच्या समन्वयातून आकारास आलेली ही शाळा सकारात्मक बदलाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
- महेश डोके, गटविकास अधिकारी, शिरूर पंचायत समिती.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या शाळेची दखल घेऊन भेट दिल्याने शिक्षक, ग्रामस्थ व पालक वर्गाच्या दोन वर्षांच्या कष्टाचे, मेहनतीचे सार्थक झाले. यापुढील काळात आमची शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची दखल राज्य पातळीवर होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
- बेबीनंदा सकट, सहशिक्षिका, पाचर्णे वस्ती शाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com