esakal | लॉकडाऊनच्या धास्तीने खरेदीसाठी झुंबड

बोलून बातमी शोधा

lockdown fear market shop crowd grocery

​गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात किमान ८ दिवसांचा लॉकडाउन लावण्यासाठी राज्य सरकार बैठका घेत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सामान खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

लॉकडाऊनच्या धास्तीने खरेदीसाठी झुंबड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ‘‘दादा, पाच किलो गहू द्या, एक किलो कोबी द्या... भैय्या कोकम सरबताची बॉटल, दोन किलो साखर, चार मॅगीचे पुडे द्या...’’ असे अजून बरेच काही. ही सगळी ऑर्डर देण्याची गडबड सोमवारी सुरू होती ती किराणा दुकानामध्ये. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउननंतर पुन्हा कडक लॉकडाउन लागण्याच्या भीतीने शहरातील दुकानांसह उपनगरांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.पेठांसह हडपसर, धायरी, औंध, आंबेगाव, वडगाव, सिंहगड रस्ता, खराडी, येरवडा, वडगाव शेरी, कोथरूड, वारजे, बावधन, कोंढवा, शिवाजीनगर, बोपोडी यांसह इतर भागांत हीच परिस्थिती दिसत होती. जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर वस्तू, उत्पादने यांची बाजारपेठ देखील सुरू करावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांची होती. त्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. त्यामध्ये सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांमधील दुकानांचे शटर उघडली नाहीत. मात्र, निवासी भागातील गल्लीबोळांमधील किराणा दुकानामध्ये गर्दी होती.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात किमान ८ दिवसांचा लॉकडाउन लावण्यासाठी राज्य सरकार बैठका घेत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सामान खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळपासूनच रांगा

दत्तनगर ः आंबेगाव परिसरातील नागरिकांनी वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला होता; पण आज सकाळपासूनच नागरिकांनी भाजीपाल्यासह किराणा घेण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. या परिसरातील डी मार्टमध्ये देखील लांबच्या लांब रांग होती. नागरिकांनी मास्क लावले होते, पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन झालेले नव्हते.

पाडव्याच्या साहित्याची खरेदी

कोथरूड : गुढीपाडवा आणि लॉकडउनच्या शक्यतेने नागरिकांनी सकाळपासून किराणा दुकाने, भाजी व फळांचे विक्रेते, मिठाईची दुकाने, बँक, पेट्रोल पंप, दुग्धालय येथे गर्दी केली होती. सुतार दवाखाना परिसर, गुजरात कॉलनी, आझादनगर, सागर कॉलनी येथे भाजी, किराणा व सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जात होती. गुढीपाडव्यासाठी गाठी, कडुनिंबाचा पाला, फळे, काठी, पूजेचे साहित्य, खवा, लोणी, श्रीखंड, आंबे खरेदी करताना लोक दिसत होते. जय भवानीनगर येथे रेशनच्या दुकानावर लोकांच्या रांगा लागल्या होत्या.

दुकाने उघडली, पण...
हडपसर ः अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने महापालिका व पोलिसांनी ती बंद केली. मात्र काही वेळाने मागच्या बाजूने दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडईमध्ये देखील भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कामाशिवाय घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. हॅाटेल, रेस्टॅारंट बंद असले तरी पार्सल सुविधा तुरळक सुरू होती.

धायरी परिसरात गर्दी

सिंहगड रस्ता : लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांनी बाजारात विविध सामान खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शनिवार-रविवारी लॉकडाउनमुळे दुकाने बंद होती. त्यामुळे मंगळवारी (ता. १३) गुढीपाडव्यासाठी पूजा साहित्य, फुले, गाठी खरेदीसाठी आज नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. सिंहगड रस्ता परिसरातील सर्व चौक गर्दीने भरले होते. दांडेकर पूल, राजाराम पूल, हिंगणे चौक, विठ्ठलवाडी, आनंदनगर, माणिक बाग, वडगाव, धायरी फाटा, धायरीतील किराणा दुकानांत ग्राहकांची गर्दी होती.

कपड्यांच्या दुकानांकडे ग्राहकांची पाठ
कॅन्टोन्मेंट : उन्हाचा कडाका आणि कोरोनाची वाढती भीती असली तरी जुना पुलगेट, ईस्ट स्ट्रीट, महात्मा गांधी चौक, नाना चुडामण चौक, भवानी पेठ, छत्रपती शिवाजी मार्केट परिसरामध्ये लस्सी, ताक, सामोसे, वडापाव, हातगाड्यांवरील चमचमीत पदार्थ
खाणाऱ्यांची गर्दी झाली होती. डोक्यावर टोपी, गॉगल, मास्क घालून नागरिक दुचाकीवरून किराणा मालाच्या दुकानाबरोबर स्वीट होम, बेकरी आदी ठिकाणी खरेदीसाठी धावाधाव करताना दिसत होते. गुढीपाडव्यामुळे कपडे, पादत्राणे, फर्निचर यासह इतर दुकाने काही जणांनी उघडली होती; पण ग्राहक नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.

कात्रजमध्ये शांततेत व्यवहार
कात्रज : शहराच्या इतर भागांत किराणा दुकानांमध्ये गर्दी असली तरी कात्रज परिसरातील दुकानांमधील व्यवहार शांत होते. दोन दिवसांच्या लॉकडाउननंतर गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी काही प्रमाणात लोक बाहेर पडले. किराणा दुकानांमध्येही मोजकेच ग्राहक दिसून आले. परिसरातील वाहतूकही कमी होती.

लॉकडाउनच्या भीतीने गर्दी

मयूर कॉलनी : गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर परिसरातील दुकानांत किराणा साहित्य भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक, कपड्यांची दुकाने, फळे व भाजीपाला विक्रेते, गॕस, चप्पलची दुकाने, बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये उघडण्यात आली होती. पुढील दोन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चर्चा असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.


पावसामुळे धांदल
जे नागरिक सकाळी खरेदीसाठी बाहेर पडू शकले नाहीत, ते दुपारी चारच्या सुमारास बाहेर पडले. मात्र, शहरात अचानक मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहकांची धांदल उडाली. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. पावसामुळे सायंकाळी सहापूर्वीच संचारबंदी लागल्यासारखी स्थिती होती.

सकाळी दहा वाजल्यापासून दुकाने चालू असल्याचे दिसून आले. किराणा घेण्यासाठी दुकानात गेलो होतो; परंतु, किराणा दुकान वगळता मला कुठेही जास्त गर्दी दिसली नाही.
- राजाराम वीर, ग्राहक, कात्रज

कडक लॉकडाउन जाहीर करावे लागेल असा इशारा सातत्याने दिला जात आहे. खबरदारी म्हणून कडधान्ये व गरजेच्या वस्तू विकत घेतल्या. पाडव्याचा सण घरातल्या घरात साजरा करण्याची तयारी केली आहे.
- स्मिता कुंबरे, गृहिणी, कोथरूड