मोठी बातमी : लोहगाव विमानतळ उद्यापासून रात्री राहणार बंद

Aeroplane
Aeroplane

पुणे - लोहगाव विमानतळ सोमवार (ता. २६) पासून रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान वर्षभर बंद राहणार आहे. रात्रीची सर्व उड्डाणे दिवसा होणार आहेत. त्यानुसार विमान कंपन्यांनी वेळापत्रकात बदल केले आहेत, तर शहरातील उद्योग क्षेत्राने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील वर्षी २६ ऑक्‍टोबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यानच उड्डाणे होतील. मात्र, सकाळी आठचे विमान असल्यास प्रवाशांसाठी विमानतळ पहाटे पाच वाजता उघडण्यात येईल आणि रात्री शेवटचा प्रवासी बाहेर पडेपर्यंत ते सुरू राहणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. या कामामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने वेळापत्रकाची रचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

लोहगाव विमानतळावरून सध्या ३४ विमानांची वाहतूक होते. रोज सुमारे ८ ते ९ हजार प्रवासी ये-जा करतात. सध्या रात्री १४ विमानांची उड्डाणे सुरू आहेत. सोमवारपासून त्यांचा समावेश दिवसाच्या वेळापत्रकात होणार आहे. 

दरम्यान, विमान कंपन्यांनी वेळापत्रकाची फेररचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याची माहिती प्रवाशांना एसएमएस, ई-मेलद्वारे देण्यात येत आहे.

 रात्रीच्या फ्लाइट रद्द झाल्याने त्याचा ताण दिवसाच्या फ्लाइट्‌सवर येणार आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होणार. त्याचा परिणाम आमच्या प्रवासावरही होईल. आता प्रवासाचे वेळापत्रक फ्लाइट कनेक्‍टिव्हिटीनुसार बदलावे लागेल.
- डॉ. रितिका ओबेरॉय, उद्योजक 

प्रशासनाला या कामाची पूर्वकल्पना होती, तर त्यांनी चार महिने आधीच जाहीर करायला पाहिजे होते. ते न झाल्यामुळे रद्द झालेल्या फ्लाइटच्या तिकिटांचे प्रवाशांचे पैसे अडकले आहेत. विमानतळ सकाळी आठ ते रात्री आठऐवजी जास्त वेळ सुरू ठेवणे गरजेचे होते. 
- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे

धावपट्टीचे काम वेळेपूर्वी पूर्ण व्हावे, यादृष्टीने विमानतळ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने पुण्याला नव्या विमानतळाची गरज आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यासाठी आता वेगाने प्रयत्न होण्याची गरज आहे.
- भूषण गोखले, निवृत्त एअर मार्शल आणि विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य

पुण्यातून आता दिल्ली, बंगळुरु किंवा कोलकत्याला जाण्यासाठी इतर कनेक्‍शन शोधावी लागतील. पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराला पर्यायी व्यवस्था नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
- संजय ढेरे, उद्योजक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com