लोहगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लोहगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Published on

लोहगाव, ता. १६ : येथील उरूस व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. गावातील संत तुकाराम महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाने या उत्सवाची सुरुवात होऊन, काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक, पारंपरिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाडा शर्यती घेण्यात आल्या. या शर्यतींमध्ये परिसरासह विविध भागांतून नावलौकिक मिळवलेल्या बैलजोडींनी सहभाग घेतला होता. शर्यती पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला. नामवंत मल्लांनी आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली. कुस्ती स्पर्धेलादेखील रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.

तिसऱ्या दिवशी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि उत्साही सहभागामुळे संपूर्ण उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडला.

Marathi News Esakal
www.esakal.com