Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात घटलेला टक्का कोणाचे गणित बिघडवणार?

Pune Lok Sabha Result 2024: गेल्या दोन लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये वडगाव शेरीने भाजपला अवघ्या १५ हजारांचे मताधिक्‍य दिले आहे.
Lok Sabha Election 2024:
Lok Sabha Election 2024:Sakal

पांडुरंग सरोदे

Pune Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये नेहमी भाजपला भरभरून मतदान करणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाने या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत आखडता हात घेतला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये वडगाव शेरीने भाजपला अवघ्या १५ हजारांचे मताधिक्‍य दिले आहे. मतदारांच्या नाराजीपासून ते पक्षांतर्गत धुसफुशीमुळे येथील ‘व्होट बॅंक’ भाजपच्या हातातून निसटू लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्रपक्षांना व्यूहरचनेत बदल करावी लागेल.

या मतदारसंघामध्ये भाजप व रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) चांगली ताकद आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांना येथून ४२ हजारांचे, तर २०१९ च्या निवडणुकीत गिरीश बापट यांना या मतदारसंघाने ५६ हजार ७७५ इतके मताधिक्‍य दिले होते. मात्र यंदा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना या मतदारसंघामध्ये एक लाख १९ हजार ७३८ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना १ लाख ४ हजार ७५३ मते मिळाली. मोहोळ यांना फक्त १४ हजार ९८५ मतांचे मताधिक्य मिळाले.

या मतदारसंघात भाजप-रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) १४ ते १५ नगरसेवक होते. पक्षफुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही त्यांना साथ मिळाली आहे. भाजपची येथील ‘व्होट बॅंक’ घसरण्यामध्ये अनेक कारणे आहेत. संविधान बदलण्याची चर्चा, भाजपची मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांबाबतची भाजपची भूमिका, महागाई अशा थेट संवेदनशील मुद्यांसह फोडाफोडीचे राजकारण मतदारांच्या पचनी पडले नाही.

या मतदारसंघामध्ये दलित, मुस्लिम, ख्रिश्‍चन यांच्यासह अल्पसंख्यांक मतदारांची संख्या निर्णायक आहे. येरवडा, विश्रांतवाडी, लक्ष्मीनगर, वडगाव शेरी या पट्ट्यात मुस्लिम, दलित मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांच्यात भाजपविषयी असलेल्या नाराजीचा फायदा धंगेकर यांना झाला. धंगेकर यांना या भागात चांगली मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना मागील निवडणुकीत २१ हजार मते मिळाली होती. या वेळी वंचितच्या वसंत मोरे यांना १० हजार मते मिळाली. भाजपवरील नाराजी दलित, मुस्लिम, ख्रिश्‍चन व अन्य अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसला मत देऊन व्यक्त केली.

Sakal

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे येथील तीन नगरसेवक सक्रिय होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वरवर केलेले काम मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात अपयशी ठरले. या भागात रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) ताकद असून, त्यांची भाजपला काही प्रमाणात साथ मिळाली. मनसे, शिवसेना व अन्य मित्रपक्ष निवडणूक प्रक्रियेत फार दिसले नाहीत. कल्याणीनगर अपघातावरून आमदार सुनील टिंगरे यांना पुणेकरांचा रोष पत्कारावा लागला. त्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

फोडाफोडीच्या राजकारणामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पूर्वीप्रमाणे वातावरण नक्कीच नसेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला इथे उमेदवारी देताना कमालीची काळजी घ्यावी लागणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसने सक्षम पर्याय दिल्यास त्यांच्यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

नगर रस्ता, आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी

चांगल्या दर्जाच्या सार्वजनिक रूग्णालयाची उणीव

विमानतळाच्या हद्दीजवळील घरांच्या उंचीचा प्रश्‍न (रेड झोन)

म्हाडा कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास

कळस, धानोरी, टिंगरेनगर, येरवडा भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com