
रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दारासाठी लोकमान्य टिळकांचा पुढाकार
पुणे - लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले. तसेच, शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली. त्या लोकमान्यांवर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव नाही, असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळकांचे वंशज खापर पणतू कुणाल टिळक या वेळी उपस्थित होते.
१८८३ मध्ये जेम्स डग्लस नावाच्या एका इतिहासप्रेमी इंग्रजाने शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्यावेळी मराठी माणसाच्या मनात असलेली अस्वस्थता पाहून लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दारासाठी पुढाकार घेतला. टिळकांनी 'केसरी', 'मराठा'च्या माध्यमातून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी देणग्यांचे आवाहन केले. जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखली. १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोध्दार करण्यात आला. टिळकांचे या मंडळाच्या स्थापनेमागचे उद्देश रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार, शिवजन्मोत्सव, शिवपुण्यतिथी तसेच शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे होते, असे त्यांनी नमूद केले.
बलकवडे म्हणाले, जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी इंग्रज शिवचरित्र वाचून जिज्ञासेपोटी गडावर गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी त्याने आपल्या 'बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकात ब्रिटिश सरकारवर टीका केली. डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या मराठी माणसाच्या मनात अस्वस्थता पसरली. त्याचा परिणाम म्हणून १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारातून, न्यायमूर्ती रानडे, रावबहादुर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी तत्कालीन समाजधुरिणांनी पुण्यातील हिराबागेत एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जीर्णोध्दारासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. तसेच रायगड आणि समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारकडे एक निवेदन पाठविण्यात आले. त्याचा परिणाम ब्रिटिश सरकारने सालाना फक्त ५ रुपये नेमणूक केली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा भव्य सभेचे आयोजन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे रु. १२ हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रु. ५ हजार आणि पुरातत्त्व विभागाचे २,०४३ रुपये असे १९ हजार ४३ रुपये एकत्रित निधीतून समाधीच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरूवात झाली.
लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून अनेक शिवभक्तांनी उदार हस्ताने समाधी जीर्णोद्धार कार्यासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. दुर्दैवाने ही डेक्कन बँक १९१३ साली बुडीत निघाली. त्याविरुद्ध टिळक आणि खरे यांनी पुणे फर्स्टक्लास कोर्टात दावा दाखल करून व्याजासह ३३,९११ रुपये किंमतीचे हुकुमनामे मिळविले. परंतु त्याची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी बँक लिक्विडेशनमध्ये निघाली. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचे फार नुकसान झाले. लोकमान्य टिळकांनी डगमगून न जाता पुनश्च हरी ओम म्हणत निधी जमविण्याच्या कार्याला सुरुवात केली व बारा हजार रुपयांचा निधी जमा केला. याचबरोबर टिळक ब्रिटिश सरकारकडे समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. दरम्यान लोकमान्य टिळकांचे १९२० साली दुःखद निधन झाले. टिळकांच्या पश्चात हा संघर्ष चालूच राहिला. लोकमान्यांनी सुरु केलेल्या या संघर्षाला ३० वर्षानंतर यश प्राप्त झाले. त्यावेळचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव न. चि. केळकर यांना जीर्णोद्धाराची परवानगी देणे ब्रिटीश सरकारला भाग पडले. टिळकांच्या निधनानंतर ५ वर्षांनी म्हणजेच ६ फेब्रुवारी १९२५ ला ब्रिटिश सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी दिली.
Web Title: Lokmanya Tilaks Initiative For Restoration Of Monument At Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..