बोरघाटात वाहनांच्या ‘मैलभर’ रांगा
लोणावळा, ता. २४ : प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना बोरघाटात भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घाटात पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या असून, तासनतास सुरू असलेल्या ‘स्टॉप अँड गो’ ट्रॅफिकमुळे शेकडो वाहनांच्या क्लच प्लेट निकामी झाल्या आहेत. यामुळे ऐन घाटात वाहने नादुरुस्त होऊन थांबल्याने कोंडीत अधिकच भर पडली आहे.
बोरघाटात ‘ब्रेकडाऊन’चे संकट
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात चढणीच्या मार्गावर वाहने संथ गतीने सरकत होती. वारंवार क्लच आणि ब्रेकचा वापर केल्यामुळे इंजीन गरम होऊन शेकडो वाहनांच्या क्लच प्लेट जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. घाटाच्या मध्यभागीच विशेषतः जुन्या महामार्गावर शिंग्रोबा मंदिर व आडोशी बोगद्याजवळ वाहने बंद पडल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त वाहनांचा खच पडल्याने रस्ता अरुंद झाला असून, कोंडीची तीव्रता वाढली होती.
सलग सुट्ट्यांचा ‘ट्रॅफिक’ ब्लॉक
प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आणि जोडून आलेला शनिवार-रविवार यामुळे मुंबईकरांनी मोठ्या संख्येने लोणावळा, महाबळेश्वर आणि कोकणाकडे धाव घेतली आहे. पर्यटकांच्या वाहनांच्या अतिरिक्त भारामुळे घाटातील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात वाहतूक कोंडीत अधिक भर घालत आहेत.
पोलिस प्रशासनाची दमछाक
वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. क्रेनच्या साहाय्याने नादुरुस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खोपोली पोलिस, बोरघाट पोलिस मदत केंद्र, खंडाळा वाहतूक पोलिस मदत केंद्र यांच्या वतीने ब्लॉक घेण्यात येत काहीकाळ जड वाहनांची वाहतूक थांबवून हलकी वाहने सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

