

लोणावळा, ता. १७ : विवाह निश्चित झाल्यानंतर तरुणीने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीला लोहगडावरील एका दरीत ढकलून देत त्याचा खून केल्याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
केतन विशाल अग्रवाल (वय २५, रा. लोढा बेलमाँटो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी सुरवातीला सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लिलाकुंज, गंगाधाम-बिबवेवाडी रस्ता, बिबवेवाडी) आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनाथनगर, कोंढवा बुद्रूक) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान चेतन चौधरीचा मित्र रितेश हंगे याला अटक झाली.
केतनला न्याय मिळावा आणि आरोपींविरोधातील खटला प्रभावीपणे चालविला जावा, यासाठी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या वेळी त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विधी व न्याय विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, ॲड. निकम यांची नियुक्ती झाल्याने समाधान व्यक्त करत केतनला न्याय मिळावा आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
तांत्रिक पुराव्यांचे संकलन
या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. सिया प्रवीण गोयल, चेतन बाबूलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षीदारांसह डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही मोठ्या प्रमाणावर संकलित केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.