लोणंद - नगरपंचायतीचा ९७ कोटी ८७ लाखाचा शिलकी अर्थसंकल्प सादर

लोणंद - नगरपंचायतीचा ९७ कोटी ८७ लाखाचा शिलकी अर्थसंकल्प सादर

Published on

लोणंद नगरपंचायतीकडून करवाढ नाही

विविध योजनांसाठी निधीची तरतूद; ९७ कोटी ८७ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प

लोणंद, ता. २७ : शहराची पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी सुशोभीकरण, खेमावती नदीसह अन्य ओढ्यांची स्वच्छता व पुनर्जीवीकरण करणे, सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, घनकचरा विकास आराखडा प्रकल्प उभारणे, शॉपिंग सेंटर उभारणी, नमो उद्यान, दिव्यांग, महिला व खेळासाठी प्रोत्साहन आदी प्रमुख तरतुदीसह कोणतीही करवाढ न करता लोणंद नगरपंचायतीचा २०२६-२७ या वर्षासाठीचा ९७ कोटी ८७ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाच लाख ९० हजार रुपयांची रक्कम पुढील वर्षासाठी शिल्लक ठेवण्यात आली.
लोणंद नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांच्या अध्यक्षतेखाली आज अर्थसंकल्पीय सभा झाली. त्या वेळी नगरसेवक सचिन शेळके, भरत शेळके, रवींद्र क्षीरसागर, भरत बोडरे, सागर शेळके, रशिदा इनामदार, सुप्रिया शेळके, सीमा खरात, दीपाली शेळके, दीपाली संदीप शेळके, राजश्री शेळके, ज्योती डोणीकर, तसेच मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, कार्यालय अधीक्षक मयुरी दिसले, लेखापाल अमोल पवार व सभा कामकाज लिपिक विजय बनकर उपस्थित होते.
यावेळी अर्थसंकल्पीय सभेत सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता नगरपंचायतीचा एकूण ९७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाच लाख ९० हजार रुपयांची रक्कम पुढील वर्षासाठी शिल्लक ठेवण्यात आली. या अर्थसंकल्पीय सभेदरम्यान सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आवश्यक नवीन तरतुदी सुचविण्यात आल्या. त्यामध्ये दिव्यांग, महिला व बाल कल्याण, दुर्बल आर्थिक घटक यांच्याबरोबर आजी-माजी सैनिकांच्या शौर्याचा सन्मान म्हणून सैनिक कल्याणकारी योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे, तसेच शहरातील नागरिक व युवांमध्ये खेळासाठी प्रोत्साहनपर योजना व रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीकरिता तरतूद करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष कच्छी म्हणाले, ‘‘लोणंद शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न असून, खेमावती नदी तसेच शहरातील इतर ओढे यांचे महत्त्व ओळखून त्यांच्या पुनर्जीविकरणाकरिता तरतूद सुचवून त्यासाठी प्रयत्नशील आहे. लोणंद नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२६ व माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेतला असून, या अभियानाची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात येणार आहे.’’
मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले, ‘‘लोणंद शहराच्या घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारा जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून, याबाबत आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणून प्रशासनामार्फत या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे.’’
--------------------------------------
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

* नदी व ओढे यांच्या पुनर्जीविकरणासाठी १० लाख
* सौरऊर्जा प्रकल्पासाठी एक कोटी
* घनकचरा विकास आराखडा प्रकल्पासाठी एक कोटी
* पाणीपुरवठा योजनेसाठी ४३ कोटी
* अहिल्याबाई होळकर पुतळा सुशोभीकरण ५० लाख
* सांडपाणी व मैला प्रक्रिया केंद्रासाठी ११.५ कोटी
* नमो उद्यानासाठी एक कोटी
*शॉपिंग सेंटर उभारणीसाठी दोन कोटी
*स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी चार कोटी
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com