

लोणी काळभोर, ता. १७ : पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे भरधाव आराम बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील तीन तृतीयपंथी जखमी झाले असून, अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने कुंजीरवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी (ता. १६) पहाटे साडेचारच्या सुमारास हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर हा अपघात घडला.
रुबीना ताज (वय ४५), सानिया (वय ३८) आणि कवाना (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी नासिर फरीदशहा जमादार (वय ४७, रा. मिरज, जि. सांगली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक मोहम्मद समीर खाशीनसाहब मुल्ला (वय २६, रा. एरंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर जमादार हे आपल्या फोर्स मोटर्सच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून सात तृतीयपंथियांना घेऊन मिरज येथून थेऊरमधील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित संमेलनासाठी आले होते. पहाटे लवकर पोहोचल्याने खोली मिळते का, याची चौकशी करण्यासाठी त्यांनी हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर वाहन उभे केले होते. जमादार हे दोन तृतीयपंथियांसह लॉजमध्ये चौकशीसाठी गेले असताना अन्य पाच जण वाहनातच थांबले होते.
याचवेळी हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स इंडिया कंपनीच्या आराम बसने (क्र. एमपी ०१ झेडजी ९९२२) उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर वाहनातील तिघे जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.
बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालविल्याने अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी बसचालकाविरोधात मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.