निधी असूनही १३ गावे तहानलेलीच

निधी असूनही १३ गावे तहानलेलीच
Published on: 

लोणी काळभोर, ता. १८ : पूर्व हवेलीतील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या ७८१ कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन योजना प्रशासकीय दिरंगाईत अडकल्या आहेत. लोणी काळभोर, उरुळी कांचनसह १३ गावांमधील कामे संथगतीने सुरू असल्याने, कोट्यवधींचा निधी असूनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ दोन गावांत योजना पूर्ण झाल्या आहेत.
पूर्व हवेलीतील झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे, मात्र पाणीपुरवठ्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सुमारे ८० टक्के नागरिक बोअरवेल आणि विहिरींवर अवलंबून आहेत. अनेक ठिकाणी पाणी क्षारयुक्त असल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो, तर काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा होतो.
यंदा पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. अशा परिस्थितीत रखडलेल्या योजनांमुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष नळाला पाणी कधी येणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तरडे आणि वळती ही दोन गावे वगळता उर्वरित गावांना पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामे पूर्ण होत नसल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
लोणी काळभोरसाठी १५६ कोटी, कदमवाकवस्तीसाठी १४२ कोटी ३१ लाख, उरुळी कांचनसाठी ८९ कोटी ५३ लाख, कोरेगाव मूळसाठी ८८ कोटी १२ लाख, सोरतापवाडीसाठी ६३ कोटी ३६ लाख, थेऊरसाठी ६० कोटी ६० लाख, कुंजीरवाडीसाठी ५९ कोटी आणि आळंदी म्हातोबाचीसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय शिंदवणे, टिळेकरवाडी, अष्टापूर, पेठ आणि भवरापूर या गावांसाठीही निधी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ निधी मंजूर करून उपयोग नाही, तर तो वेळेत उपलब्ध करून कामे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.


उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, शिंदवणे आणि आळंदी म्हातोबाची येथील कामे मागील चार महिन्यांपासून संथगतीने सुरू होती. आता त्यांना पुन्हा गती मिळाली असून संबंधित योजनांची ५० ते ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. निधी वेळेवर उपलब्ध झाल्यास मे २०२७ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्यात येतील.
- इखलाश शेख, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.