पुण्यातील पोलिसांनी घडविले `असे` माणुसकीचे दर्शन...

नीलेश कांकरिया
Sunday, 24 May 2020

मजुरांसाठी वाघोलीकरही मदतीसाठी पुढे आले होते. शक्य होईल तेवढी मदत स्वखर्चाने, सोसायटी, ग्रुप, संस्था यांनी करत त्यांच्या खाण्याची व पाण्याची व्यवस्था केली.

वाघोली (पुणे) : लोणीकंद पोलिसांनी 12, 500 परप्रांतीय मजुरांना एसटी महामंडळ बस, खाजगी बस व  वाहनाद्वारे त्यांच्या राज्यात पाठविले. वाघोलीतील बाजार तळ मैदानात त्यांची पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आठ दिवस पोलीस यासाठी मेहनत घेत होते. वाघोलीकरही मदतीसाठी पुढे आल्याने या मजुरांना अन्न, फळे, बिस्कीट व पाणी भरपूर मिळाले.

पुणे विद्यापीठ दीड तासांची ५० गुणांची परीक्षा घेणार

150 एसटी बस मधून 5500 परप्रांतीयांची व्यवस्था करण्यात आली. तर 6800 नागरिकांना जाण्यासाठी पासेस देण्यात आले. केवळ वाघोलीतीलच नव्हे तर शहरातील विविध भागातील मजूरही येथे जाण्यासाठी येत होते. मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील हे मजूर होते. बाजार तळ मैदानात त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपलब्ध एसटी महामंडळ बस नुसार या मजुरांना पाठविण्यात आले.

चिंताजनक : सदाशिव पेठ ते कोथरुड कोरोना कनेक्शन वाढली चिंता

मजुरांसाठी वाघोलीकरही मदतीसाठी पुढे आले होते. शक्य होईल तेवढी मदत स्वखर्चाने, सोसायटी, ग्रुप, संस्था यांनी करत त्यांच्या खाण्याची व पाण्याची व्यवस्था केली. फळे, चपाती भाजी, पुलाव, बिस्कीट, फरसाण, चिवडा, पाणी, सॅनिटायझर आदी वाघोलीकर पुरवत होते. जाण्याची कोणतीच सोय नसल्याने दहा दिवसांपूर्वी मजूर पायी निघाले होते. लोंढे पायी जात होते. मात्र, या मजुरांना वाघोलीत थांबवून त्यांची जाण्याची व्यवस्था लोणीकंद पोलिसांनी सुरू केली. वाघोलीतून जाण्यासाठी व्यवस्था होत असल्याचे कळाल्यानंतर शहरातील अनेक भागातील मजूर येथे येऊ लागले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पोलिसांनी त्यांचीही व्यवस्था करून त्यांना परराज्यात पाठविले. यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, नितीन आतकरे, केशव वाबळे,धनंजय ढोणे, हणुमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब गाडेकर, राजाभाऊ गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

 रेल्वेने 1024 मजूर रवाना

मध्य प्रदेशातील 341 व उत्तर प्रदेशातील 916 मजूर रेल्वेने त्यांच्या प्रांतात परतले. पीएमपीएल बस द्वारे त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्यात आले. त्यांच्यासाठी फूड पॅकेटची ही व्यवस्था करण्यात आली होती. मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, तलाठी बाळासाहेब लाखे, अशोक शिंदे, पवन शिवले, सचिन मोरे, पांडुरंग डुंबरे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

 

अन् `त्या` सोसायटी कडूनही अन्न

गरजूंना मदत देण्यासाठी गिरीश गोयल या सोसायटी धारकाने धान्य किट आणले. ते सोसायटीच्या क्लब हाउस मध्ये ठेवले. ते धान्य हलवा नाही तर त्याचे भाडे आकारू असे सोसायटीच्या वर्किंग कंमिटीने त्या सोसायटी धारकाला सांगितले. अखेर त्याला ते किट तेथून हलवावे लागले. वाघोलीतील आय व्ही इस्टेट मधील उमंग सोसायटी मध्ये हा प्रकार घडला होता. मात्र त्या सोसायटी कमिटी, सोसायटी धारकांनी परप्रांतीय मजुरांना 400 पेक्षा जास्त फूड किट, पाणी बाटली, फरसाण आदी वाटप मजूरांना करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली. हे वाटप करण्यासाठी तेजराज, संपदा कट्टी, मनीषा ब्रम्हे रितेश सिंघल, अमोल जोशी, श्रीनिवास लोखंडे, नितीन खैरनार, लिमये व रॉबीन हूड आर्मीचे गिरीश गोयल, सुजित सिन्हा, प्रीती खन्ना, निलेश बागरेचा, समीक्षा तिवारी, प्रताप, सुनील यांनी पुढाकार घेतला.

 

मुस्लिम बांधवांसाठी शिधा किट

 रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वाघोली  येथे बैठक घेण्यात आली. मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी  वाघोली, केसनंद, कोलवडी येथील गरीब व गरजू मुस्लिम बांधवांसाठी  130 शिधा किट वाटपासाठी लोणीकंद पोलिसांनकडून विशेष पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lonikand police help to workers in pune