कोण आलंय तब्‍बल सहा वर्षांनी पहा

नितीन चौधरी
Thursday, 20 February 2020

टॅग का करतात?
पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी टॅग म्हणजे निशाणी केली जाते. त्यांचा प्रवास या टॅगमधून कळतो. जगभरातील संशोधक यावरून त्याचा प्रवास कसा झाला, याचा अंदाज लावू शकतात. हल्ली जिओ टॅगमुळे त्याच्या प्रत्येक तासाच्या प्रवासाची बातमी मिळत राहते.

पुणे - स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारत माहेरघर असल्याचे म्हटले जाते. याचा प्रत्यय भिगवणजवळील भादलवाडीत सहा वर्षांपूर्वी आलेला चित्रबलाक पुन्हा आढळला आहे. महत्त्वाचे म्हणजे चित्रबलाकला बर्ड फ्लूची लागण होण्याची शक्‍यता नसल्याचे संशोधनात आढळले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील ईला फाउंडेशन, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि राज्याच्या वन विभागातर्फे २०१४ मध्ये चित्रबलाक, काळ्या डोक्‍याचा शराटी, राखी बगळा, छोटा बगळा आदी पक्ष्यांची बर्ड फ्लूची चाचणी घेण्यात आली. सुदैवाने हे पक्षी यापासून मुक्त होते. या वेळी एका चित्रबलाक पक्ष्याच्या पंखाला टॅग करण्यात आले. चाचणीवेळी तो अडीच किलो वजनाचा, सुदृढ आणि रोगमुक्त होता. हाच चित्रबलाक भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पाणथळ अधिवासात सहा वर्षांनी पुन्हा दिसला, त्याच्या टॅगवरून त्याला ओळखणे शक्‍य झाले, तो सुदृढ असून रोगमुक्त दिसला. यावरून चित्रबलाक पक्षी बर्ड फ्लूला बळी पडत असण्याची शक्‍यता नसल्याचे ईला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘एखाद्या अधिवासात चित्रबलाक पुन्हा सहा वर्षांनी परतणे ही बाब भारतात प्रथमच घडत आहे, यावरून हे पक्षी नैसर्गिक अधिवासात सहा वर्षांहून अधिक काळ जगू शकतात हे सिद्ध झाले. तसेच, भादलवाडीसारख्या अधिवासात तो पुन्हा आढळला, यावरून हा अधिवास अशा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.’’ 

देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या  2023 पर्यंत 90 कोटींवर 

चित्रबलाक पक्षी नियंत्रित वातावरणात (संग्रहालयात) साधारणपणे १४ ते १५ वर्षे जगतात. मात्र, नैसर्गिक अधिवासात खाद्य, रोग व इतर आपत्तींचा सामना करत त्यांचे आयुष्य कमी होते. चित्रबलाक सहा वर्षे जगू शकतो, हे या टॅगवरून पहिल्यांदा कळाल्याचेही पांडे म्हणाले. फाउंडेशनने केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट होत आहे. 

आता दुसऱ्या पत्नीलाही द्यावी लागणार पोटगी

टॅग असलेला तिसरा पक्षी
२०१४ मध्ये टॅग केलेला काळ्या डोक्‍याचा शराटी पुढच्याच वर्षी भादलवाडीत आढळला. २०१७ मध्ये एक चित्रबलाक त्याच ठिकाणी परतला होता. आता पुन्हा सहा वर्षांनी दुसरा चित्रबलाक येथे आला आहे. यावरून हा अधिवास या पक्ष्यांना जवळचा वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look at who came in just six years