पुण्यात वाहनतळावर प्रेक्षकांची होतेय लूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

संबंधित ठेकेदाराला पूर्वी नोटीस पाठविण्यात आली आहे. आता देखील नोटीस पाठविण्यात येईल. ठेकेदाराने अतिरिक्त शुल्क आकारल्यास मुंबई महापालिका अधिनियमाच्या ८१ ब अंतर्गत ठेका रद्द करण्यात येईल.
- मुुकुंद बर्वे, उपअभियंता, मालमत्ता विभाग, पुणे महानगरपालिका 

बालगंधर्वमध्ये विविध राजकीय पक्षाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे कार्यकर्ते वाहन शुल्क देत नाहीत. नाट्यगृहातील नाटकांची संख्या कमी झाल्यामुळे खर्च परवडत नाही. 
- रणजित जगताप, ठेकेदार, बालगंधर्व वाहनतळ

येरवडा - बालगंधर्व रंगमंदिराच्या वाहनतळावर दुचाकी व चारचाकीसाठी निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट रकम आकारली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस देणार असल्याचे मालमत्ता विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून बालगंधर्व रंगमंदिराच्या वाहनतळाचा ठेका रणजित जगताप यांना प्रति वर्ष सहा लाख ४० हजार रुपये दराने २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी दिला आहे. शर्ती व अटीप्रमाणे दुचाकीला प्रति तास तीन रुपये, तर मोटारीला चौदा रुपये शुल्क आकारणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित ठेकेदार दुचाकीधारकाकडून प्रतितास पाच रुपये, तर मोटारधारकांकडून वीस रुपये शुल्क आकारत असल्याची तक्रार दक्षता महिला आधार संस्थेच्या शोभा सुतार यांनी केली आहे. वाहनतळावर दर फलक नसल्यामुळे अनेकांची फसवणूक होत आहे. तक्रार करूनही महापालिका कारवाई करीत नसल्याची टीका सुतार यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loot at the vehicle parking in Pune