
आंतरराष्ट्रीय पातळीवरील वक्ते गौरांग प्रभू यांचे ‘भगवद्गीतेत सांगितलेले आदर्श नेतृत्वगुण’ विषयावर व्याख्यान शनिवारी झाले.
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून सांगितले आदर्श नेतृत्वगुण - गौरांग प्रभू
पुणे - ‘आपल्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिक गुण, उत्कृष्ट संवाद साधण्याचे कौशल्य, प्रश्न व समस्या सोडविण्याची वृत्ती, संवेदनशील मन आणि चांगले मार्गदर्शक, नियंत्रक, प्रशिक्षक असणे असे पाच गुण असणे आवश्यक आहे. आदर्श नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या या पाच गुणांचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण यांनी श्रीमद् भगवद्गीता यातून सांगितले आहे,’ असे कानमंत्र इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य गौरांग प्रभू यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील वक्ते गौरांग प्रभू यांचे ‘भगवद्गीतेत सांगितलेले आदर्श नेतृत्वगुण’ विषयावर व्याख्यान शनिवारी झाले. त्यावेळी त्यांनी गीतेतील नेतृत्वगुणांबद्दल सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, ‘आदर्श नेतृत्व करण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणे, आत्मविश्वास असणे, अशी वैयक्तिक कौशल्य असणे गरजेचे आहे. त्याशिवाय नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने चांगले वक्ता असण्याबरोबरच उत्तम श्रोता असणेही गरजेचे आहे. एखाद्याचा प्रश्न समजावून घेत किंवा समोर आलेल्या समस्येवर मात करण्यासाठी उपाय शोधण्याच्या क्षमता विकसित असायला हव्यात.
त्याचबरोबर सहकाऱ्यांप्रती संतुष्ट भावना, संवेदनशीलता ही तितकीच महत्त्वाची आहे. आदर्श नेतृत्व करण्यासाठी आपण मूळात एक चांगला प्रशिक्षक, नियंत्रक आणि मार्गदर्शक असायला हवेच, त्याचबरोबर सतत प्रेरणा देणारे ठरले पाहिजे, असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. आपल्यात नेतृत्वगुण विकसित होण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठी गीता समजून घ्यायला हवी.’
‘विद्येचे मूल्य हे केवळ परीक्षा देऊन पदवी मिळविणे, हे असून नये. तर विद्या ही माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आत्मसात करणे अपेक्षित आहे,’ असे गौरांग प्रभू यांनी नमूद केले. या कार्यक्रमात समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे, शिक्षण प्रसारक मंडळी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अशोक गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते.