प्रवाशांची लाडकी लाल परी रुळावर येईना 

मिलिंद संगई
Tuesday, 11 August 2020

लॉकडाउन संपल्यानंतरही एसटीची लाल परी अजूनही रुळावर येईना. त्यामुळे रस्त्यावर बस आणून मंडळाला अधिक नुकसान सहन करावे लागत आहे.

बारामती (पुणे) : लॉकडाउन संपल्यानंतरही एसटीची लाल परी अजूनही रुळावर येईना. त्यामुळे रस्त्यावर बस आणून मंडळाला अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. बारामती आगाराचे कामकाज 20 मार्चपासून ठप्प असून, मध्यंतरी सुरु झालेल्या काही गाड्यांमुळे उत्पन्नाऐवजी तोटाच अधिक झाल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लॉकडाउन संपल्यानंतर बारामती आगाराने काही बस सरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारामती- स्वारगेट, बारामती- वालचंदनगर, बारामती- भिगवण या मार्गावर सेवा सुरु झाली. कोरोनामुळे एका गाडीमध्ये 22 प्रवाशांहून अधिक प्रवासी न घेण्याचे एसटीचे धोरण आहे. प्रत्यक्षात सद्यस्थितीत दहा प्रवाशांहून अधिक प्रवासी बसमध्ये प्रवासच करत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मार्गावर एसटी धावणे, महामंडळाला तोट्याचेच ठरत आहे. डिझेल व इतर घटकांवर होणारा खर्च हा उत्पन्नाहून अधिक असल्याने एसटी रस्त्यावर आणणेही घाट्याचाच सौदा ठरु लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 

रामती- पुणे मार्गावर शंभर किलोमीटर अंतरासाठी 25 लिटर डिझेल लागते. डिझेलच्या दराचा विचार करता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या प्रवाशांमध्ये एसटी चालविणे न परवडणारे आहे. दुसरीकडे प्रवासी संख्या दहापर्यंतही पोहोचत नसल्याने एकतर फेऱ्या रद्द करणे किंवा आहे त्या प्रवासी संख्येत गाडी सुरु ठेवणे, हे दोनच पर्याय सध्या एसटी प्रशासनासमोर आहेत. 

लॉकडाउन संपून अनेक दिवस होऊनही एसटी गाडी रुळावर यायला तयार नाही, असेच चित्र आहे. एसटी आंतरजिल्हा वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यास सज्ज आहे. मात्र, प्रवासीच नसल्याने अनेकदा फलाटासमोर लावलेल्या गाड्या नाईलाजाने पुन्हा आगारात नेण्याची पाळी येत आहे. बारामती- पुणे- बारामती हा मार्ग एसटीसाठी सर्वाधिक उत्पन्न देणारा आहे. मात्र, पुण्यातच कोरोनाचा उद्रेक असल्याने बहुसंख्य जण पुण्याला जाणे टाळत आहेत. त्याचा परिणाम लाल परीवरही विपरीत झाला आहे. जवळपास पाच महिन्यांपासून एसटीची सेवा ठप्प झाल्यासारखी असल्याने वाहक व चालकही आता अस्वस्थ झाले आहेत. 

अनेकदा परवडत नसतानाही आम्ही कमी प्रवासी असतील तरी गाडी सोडतो, या मागे लोकांची सोय व्हावी, हाच उद्देश असतो.
 - अमोल गोंजारी, आगार व्यवस्थापक, बारामती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Losses to ST Corporation due to non-receipt of passengers