

PNE26W61636
माढा ः माढेश्वरी देवीच्या यात्रेत झालेली गर्दी व दुकाने. (सुमित डिजीटल, माढा)
माढेश्वरी देवीच्या छबिना उत्सवात हजारोंची गर्दी
माढा, ता. २५ : रविवारी (ता. २५) रात्री निघालेल्या माढेश्वरी देवीच्या यात्रेतील छबिना उत्सवात भक्त, भाविक, मानकरी व पंचक्रोशीतील हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
माढेश्वरी देवीची यात्रा रविवारपासून सुरू झाली. रविवारी दिवसभर भाविकांनी माढेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सायंकाळ झाल्यानंतर माढा परिसरातील गावातील यात्रेतील मानाची वाहने मंदिरात येऊ लागली. छबिना उत्सवात माढेश्वरी देवीच्या मुख्य वाहन असलेल्या हत्ती या वाहनासह घोडा, नंदी, गरूडपक्षी, काळवीट, सिंह, मोर, वाघ अशी मानाची वाहने सजविण्यात आली होती. घोडा या वाहनाची माढा शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मंदिर परिसर, शिखरे व तटबंदी व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर यात्रा पंच कमिटीने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मंदिर व गाभारा फुलांनी सजवला होता. देवीचे मुख्य वाहन असलेल्या हत्ती या वाहनासमोर मानकऱ्यांची वाहन नाचत पूर्वेकडील मातंगदेवीच्या भेटीस गेली. माढेश्वरी देवीचे मंदिर व संपूर्ण परिसर हजारो भक्तांनी फुलून गेला होता. रात्री देवीच्या छबिना उत्सवात बॅंड, हालगी, लेझीम यासह पारंपारिक वाद्य वाजविण्यात आली. देवीचा छबिना उत्सव डाॅल्बीमुक्त राहिला. कलिगीतुरा व धनगरी ओव्यांचाही कार्यक्रम छबिना उत्सवात झाला.
यात्रेनिमित्त यंदाही मंदिर परिसरात निमगाव रस्त्याकडील शेतात लहान-मोठी खेळणी, पाळणे, आकाशपाळणे, मिठाईची दुकाने व हॉटेलचे मोठे स्टॉल्स थाटण्यात आले होते. लहान मुलांच्या करमणुकीसाठी विविध खेळण्यांची दुकाने आणि मोठ्या पाळण्यांमुळे यात्रा परिसरात एकच जल्लोष पाहायला मिळाला. दर्शनानंतर भाविक आणि लहान मुलांनी या खेळण्यांचा व पाळण्यांचा मनमुराद आनंद लुटला, तर महिलांनी संसारोपयोगी साहित्य, कटलरी व बांगड्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. या सर्व स्टॉल्समुळे संपूर्ण यात्रा परिसराला एका सोहळ्याचे रूप प्राप्त झाले होते. यात्रेचे अतिशय नेटके नियोजन पाहायला मिळाले.