मधुकर बाबुराव डेरे

मधुकर बाबुराव डेरे
Published on

जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व ः मधुकर डेरे
--------------------
कवठे गावाच्या सार्वजनिक जीवनातील (कै.) मधुकर बाबूराव डेरे अर्थात बापू हे एक जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने एका कुटुंबाचा आधार तर हरपलाच; पण गावाच्या सामाजिक, कृषी आणि सहकार क्षेत्रातील एक विश्वासू चेहरा काळाच्या पडद्याआड गेला.

-----------

कवठे गावाला सामाजिक आणि सार्वजनिक कार्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि धुरंधर राजकारणी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या कार्यकर्तृत्वाने या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली. गावासाठी काहीतरी करण्याची ही परंपरा अनेक पिढ्यांनी पुढे नेली. बापूंच्या जीवनातही गावाविषयीची ही नाळ अखेरपर्यंत घट्ट राहिली. मातीशी त्यांचे नाते अत्यंत घट्ट होते. शेती त्यांच्यादृष्टीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हते; ती त्यांच्या जगण्याची ओळख होती. खिल्लार बैलजोडी, गच्च भरलेली बैलगाडी आणि डौलदार शेतकरी ही त्यांची प्रतिमा आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले. कष्टाच्या घामाला त्यांनी प्रतिष्ठा दिली आणि श्रमाची शिकवण पुढील पिढीला दिली. त्यांच्या राहुल आणि अतुल या दोन्ही मुलांनी शेतीचा हा वारसा पुढे चालवला, हीच त्यांच्या संस्कारांची पावती आहे.
बापूंच्या कर्तृत्वाची व्याप्ती शेताच्या बांधापलीकडे होती. गावाच्या प्रश्नांना ते कधीच परके मानत नसत. गावाचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न, या भावनेने त्यांनी सामाजिक उपक्रम आणि विकासकामांत सहभाग घेतला.
भैरवनाथ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातही जबाबदारी पार पाडली. शेतकरी आणि सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनाला आधार मिळावा आणि सामूहिक प्रयत्नांतून विकास साधता यावा, या भावनेने त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.
शिक्षण क्षेत्राशीही त्यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. क्रांतिवीर शैक्षणिक प्रतिष्ठानचे संचालक म्हणून त्यांनी शैक्षणिक कार्यात सहभाग घेतला. शेती, सहकार आणि शिक्षण या विविध क्षेत्रांतील त्यांचा सहभाग त्यांच्या व्यापक सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवतो.
माणूस किती काळ जगला यापेक्षा तो गेल्यानंतर किती मने त्याला आठवतात, हे त्याच्या आयुष्याचे खरे मोजमाप असते. बापूंनी माणुसकीची जी श्रीमंती कमावली, तीच त्यांची खरी ओळख आहे.
त्यांनी जपलेली माणुसकी, कष्टाची प्रतिष्ठा, गावाविषयीची बांधिलकी आणि पुढील पिढीवरील विश्वास आपण जपला, तर तीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल.

- अंकुश डेरे

45653 मधुकर डेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com