ग्रामविकासासाठी झटणाऱ्या माधुरी निलख
- राजेश कणसे, आळेफाटा (ता. जुन्नर)
मुंबईसारख्या महानगरात वाढलेली एक सर्वसामान्य मुलगी लग्नानंतर ग्रामीण भागात आली आणि शेती, समाजकारण व ग्रामविकास या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू लागली. जुन्नर तालुक्यातील वडगाव (कांदळी) येथील माजी सरपंच व विद्यमान पंचायत समिती सदस्या माधुरी सचिन निलख यांची ही प्रेरणादायी वाटचाल आहे. शेतीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी कुटुंबाच्या पाठबळावर शेतीत हातभार लावला आणि त्याचबरोबर गावाच्या विकासासाठीही पुढाकार घेतला. सरपंचपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महिला सबलीकरण, पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा उभारण्यावर त्यांनी भर दिला. प्रामाणिक कामगिरीची दखल घेत मतदारांनी त्यांना पंचायत समितीवर निवडून देत पुन्हा एकदा विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा हे माधुरी निलख यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे बालपण मात्र मुंबईत गेले. त्यांच्या वडिलांच्या नोकरी-व्यवसायानिमित्त कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांचा जन्मही मुंबईतच झाला आणि बालपणापासूनचे संपूर्ण शिक्षणही मुंबईतच झाले. त्यांनी वडाळा येथील ज्ञानेश्वर हायस्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये त्यांचा विवाह जुन्नर तालुक्यातील वडगाव-कांदळी येथील शेतकरी कुटुंबातील सचिन दादाभाऊ निलख यांच्याशी झाला. मुंबईसारख्या महानगरात वाढलेल्या माधुरी निलख यांना सुरुवातीला ग्रामीण जीवन आणि शेतीविषयक कामांचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र सासरच्या घरातील वातावरण, शेतीविषयी असलेली चर्चा आणि कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन यामुळे त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. त्यांचे सासरे स्व. रमणशेठ ऊर्फ दादाभाऊ महादू निलख हे त्या काळात परिसरातील कृषी क्षेत्रात मानाचे स्थान असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि घरातील सातत्याने होणाऱ्या शेतीविषयक चर्चांमुळे माधुरी निलख यांनीही शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी शेतीतील विविध कामांमध्ये रस घेतला आणि पती सचिन निलख यांच्यासोबत शेती नियोजन, मशागत तसेच पिकांच्या संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभाग घेऊ लागल्या. सचिन निलख यांना शेतीसोबतच समाजकार्याचीही विशेष आवड असल्याने ते गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय असायचे. गावातील अनेक सामाजिक कार्यक्रम, उपक्रम आणि सार्वजनिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या या कामाची दखल घेत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत २०१४ पासून श्री बिरोबा महाराज नागरी सहकारी पतसंस्था, वडगाव (कांदळी) या संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड केली. त्यांनीही या जबाबदारीचे भान ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
लग्नानंतर माधुरी निलख यांचा संसार सुरळीत सुरू होता. दोन मुलांचे शिक्षणही सुरू होते आणि त्याचबरोबर शेतीची जबाबदारीही सांभाळली जात होती. अशाच काळात २०१५मध्ये गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. त्या निवडणुकीत सरपंचपद हे महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी माधुरी निलख यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. सुरुवातीला त्यांनी या प्रस्तावाला थोडीशी हरकत घेतली. कारण त्यावेळी मुलांचे प्राथमिक शिक्षण आणि शेतीची जबाबदारी याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटत होते. मात्र कुटुंबातील सदस्य आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची संधी म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिला. समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो या भावनेतून अखेर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व घटकांतील लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या कुटुंबाचे समाजातील योगदान आणि विश्वासार्हता यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या वडगाव-कांदळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाले.
सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला. महिला सबलीकरण हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी महिला बचत गटांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. गावाचा विकास साधण्यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा केला. दरम्यान, कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी गावकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना काळात नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण टीमसह प्रयत्न केले. सरपंच म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने मेहनत घेतली. ग्रामीण भागातील महिलांनी केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणी म्हणून नव्हे, तर समाजाच्या विकासातही सक्षम नेतृत्व देऊ शकते, हे माधुरी सचिन निलख यांच्या प्रवासातून अधोरेखित होते.
मुंबईत वाढलेली एक सर्वसामान्य मुलगी लग्नानंतर ग्रामीण भागात येते, शेतीची जबाबदारी स्वीकारते आणि पुढे गावाच्या विकासाची धुरा आपल्या खांद्यावर घेत समाजासाठी काम करू लागते, ही त्यांची वाटचाल अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावातील पायाभूत सुविधा उभारणे, महिला सबलीकरणाला चालना देणे आणि ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता समाजाच्या प्रगतीतही महत्त्वाची भूमिका बजावावी, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. गावातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गट, प्रशिक्षण उपक्रम आणि लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे वडगाव-कांदळी गावात विकासाची नवी दिशा मिळाली आणि ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले. आज पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्या ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकऱ्यांच्या समस्या याकडे लक्ष देत सर्वसमावेशक विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांचा विश्वास आणि सहकार्य हीच आपल्या कामाची खरी ताकद असल्याचे त्या नमूद करतात. समाजासाठी काम करण्याची प्रामाणिक इच्छा, लोकांचा विश्वास आणि कुटुंबाचे पाठबळ या बळावर त्यांनी उभारलेली ही वाटचाल खऱ्या अर्थाने महिला शक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरते. आगामी काळातही समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करत राहण्याचा त्यांचा निर्धार अनेकांना नवी प्रेरणा देणारा आहे.
पायाभूत सुविधांवर भर
मुख्यमंत्री स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत गावाची निवड झाल्यानंतर त्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली. ग्रामसचिवालयाचे बांधकाम, गावातील अंतर्गत पक्के रस्ते, बंदिस्त गटार योजना, वाडी-वस्त्यांवर विजेची व्यवस्था अशा अनेक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांनी विशेष लक्ष दिले. उच्चशिक्षित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच गावातील सर्व अंगणवाड्यांना सोलर ऊर्जा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण फिल्टर प्लांट बसविण्यात आला.
कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गावाच्या कामांना प्राधान्य
अनेकदा कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष करून त्यांनी गावाच्या कामांना प्राधान्य दिले. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे गावात विकासाची अनेक कामे पूर्ण झाली. त्यांच्या या कामाची दखल तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी घेतली. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. खोडद पंचायत समिती गणातील मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले आणि जुन्नर पंचायत समितीवर निवडून देत काम करण्याची संधी दिली.अधोरेखित होते.
हा आहे मानस
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात आणखी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि नगरसेवक विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा निर्धार आहे. माधुरी निलख यांच्या मते, सार्वजनिक पद हे वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नसून समाजाच्या विकासासाठी असते. समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणे हीच लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

