

मध्य प्रदेशातील दोन मंदिरांत
स्वातंत्र्यदिन आधीच साजरा
तिथीनुसार पालन : ११ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम
इंदूर, ता. १४ (पीटीआय) : देशभरात १५ ऑगस्ट रोजी ८० व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच, मध्य प्रदेशातील भगवान शिव आणि गणेश देवतांच्या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये ११ ऑगस्ट रोजीच राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला. मंदसौर आणि उज्जैनमधील या मंदिरांमध्ये विशेष धार्मिक विधी, प्रार्थना, ध्वजारोहण आणि तिरंगा यात्रा हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते.
मंदसौरमधील पशुपतिनाथ मंदिर आणि उज्जैनमधील बडे गणेश मंदिर येथे १५ ऑगस्टऐवजी हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण कृष्ण चतुर्दशीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची अनोखी परंपरा पाळली जाते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण कृष्ण चतुर्दशी ही तिथी होती, असे पुजाऱ्यांनी सांगितले. या वर्षी ही तिथी ११ ऑगस्ट रोजी आली होती.
इंदूरपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेल्या मंदसौरमधील शिवना नदीकाठी वसलेल्या प्राचीन पशुपतिनाथ मंदिरात मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष धार्मिक विधी पार पडले. ज्योतिष आणि कर्मकांड परिषदेचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी माहिती दिली की, उत्सवादरम्यान मंदिरातील अष्टमुखी शिवलिंगाची विशेष सजावट आणि पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला सुमारे २५० भाविक उपस्थित होते आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.
जोशी म्हणाले, की आम्ही वैदिक मंत्रोच्चारात दुर्वायुक्त जलाने शिवलिंगाचा अभिषेक केला. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र व्हावा, अशी प्रार्थना आम्ही केली. दुर्वायुक्त जलाने भगवान शिवाचा अभिषेक केल्याने भाविकांच्या अडचणी दूर होतात, अशी हिंदूंची श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले. १९८५ पासून या प्राचीन मंदिरात श्रावण कृष्ण चतुर्दशीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. उज्जैनमधील प्रसिद्ध बडे गणेश मंदिरातही मंगळवारी पारंपरिक भक्ती आणि उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित पुजारी अक्षत व्यास यांनी सांगितले की, हे मंदिर ग्रेगरियन कॅलेंडरऐवजी हिंदू दिनदर्शिकेतील तिथीनुसार राष्ट्रीय सण साजरे करण्याच्या अनेक दशकांच्या परंपरेचे पालन करते. या मंदिरात भगवान गणेशाची ‘प्रजासत्ताकाचा देव’ म्हणूनही पूजा केली जाते. व्यास यांनी सांगितले, की ११ ऑगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणा देत मंदिरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त भगवान गणेशाला राष्ट्रध्वज अर्पण केल्यानंतर विशेष महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर मंदिराच्या मुख्य शिखरावर तिरंगा फडकवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.