Madhya Pradesh pattern for final year exams use in maharashtra Students demands
Madhya Pradesh pattern for final year exams use in maharashtra Students demands

अंतीम वर्ष परीक्षेसाठी मध्यप्रदेश पॅटर्न? सुरक्षीततेसाठी विद्यार्थ्यांची मागणी

पुणे : थेट महाविद्यालयात परीक्षा घेणे शक्य नाही, आॅनलाईन परीक्षेला नेटवर्कचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे मध्यप्रदेश पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना ईमेलवर  प्रश्नपत्रिका पाठवून घरी बसून उत्तरपत्रिका सोडविण्याची मुभा द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्यात कोणत्या पद्धतीने परीक्षा द्यावी यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची समिती गठीत केली आहे. या समितीच्या अहवालावर राज्यपालांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, थेट परीक्षा घेणे अशक्य आहे, पुणे आणि मुंबई विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी तयारी नाही.

कुलगुरूंच्या बैठकीतही मध्यप्रदेश पॅटर्नवर चर्चा झाल्याने नेमका निर्णय काय होतो याकडे लक्ष लागले आहे. मायक्रोबायोलाॅजीत एमएससी करणारा गणेश आवारे म्हणाला, "मध्यप्रदेश सरकारने विद्यार्थी व महाविद्यालये यांना सोईचे होईल यादृष्टीने विद्यार्थ्यांना घरात बसून उत्तर पत्रिका लिहिण्याची सुविधा दिली आहे. यात परीक्षा घेण्याचा उद्देश सफल होऊ शकतो.  आमचे योग्य मूल्यमापन होऊन पदवी मिळू शकते."

पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी कमलाकर शेटे म्हणला, "होम असाइनमेंट हा पर्याय चांगला आहे. विद्यार्थी सुरक्षीत वातावरणात परीक्षा देऊन पदवी प्राप्त करू शकतात." एमकाॅम करणारी उत्कर्षा पाटील म्हणाली, " आॅनलाईन परीक्षा हे माध्यम चांगले आहे, पण गावात वीज आणि नेटवर्क हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे ओपन बुक किंवा असाइनमेंट बेस परीक्षा घ्यावी." राज्य सरकारच्या समितीचे प्रमुख डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. 

काय आहे मध्यप्रदेश पॅटर्न? 
अंतीम वर्षाच्या परीक्षेसाठी संबंधित विद्यापीठाने प्रत्येक विषयाची एकच प्रश्नपत्रिका तयार करावी. ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांचे लाॅगईन असलेल्या एसआयएस प्रणालीवर अपलोड करावी. विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळात ते घरी बसून प्रश्न सोडवतील. त्यानंतर नाव, रोल नंबर, महाविद्यालय अशी सर्व माहिती लिहून जवळच्या परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा करतील. त्यानंतर त्या संबंधित महाविद्यालयांना पाठविल्या जातील, असे मध्यप्रदेश सरकारच्या आदेशात नमूद केले आहे. 

सर्वच माध्यमात त्रुटी 
आॅनलाईन, ओपन बुक, असाइनमेंट बेस यासह सर्वच परीक्षेच्या माध्यमांमध्ये काहीना काही त्रुटी आहेत. पुणे विद्यापीठ आॅनलाईनलाच प्राधान्य देणार आहे. पण ज्यांना आॅनलाईन शक्य झाले नाही त्यांच्यासाठी आणखी दोन संधीद्वारे परीक्षा देता येऊ शकेल असे एका वरिष्ठ प्राध्यापकांनी सांगितले. 

राज्यातील अकृषी विद्यापीठ - १३ 
अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची 
संख्या - सुमारे ९ लाख
पुणे विद्यापीठातील संख्या - सुमारे २.२५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com