महाबळेश्वर नगरपरिषदेचा १६९.७३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; पर्यटनाला झळाळी अन् पायाभूत सुविधांवर भर

महाबळेश्वर नगरपरिषदेचा १६९.७३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; पर्यटनाला झळाळी अन् पायाभूत सुविधांवर भर

Published on

महाबळेश्वरात करवाढ नसलेला अर्थसंकल्प

पर्यटनवृद्धी, शहर सुशोभीकरण अन्‌ पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर भर

महाबळेश्वर, ता. ३ ः जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांवर कोणताही नवीन कराचा बोजा न टाकता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ‘पर्यटन वृद्धी, शहर सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धन’ या त्रिसूत्रीवर आधारित हा अर्थसंकल्प शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत मांडलेल्या या अंदाजपत्रकात एकूण १६९.७३ कोटी रुपये जमा अपेक्षित धरली आहे. त्या तुलनेत १६९.६४ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजनानंतर हा अर्थसंकल्प नऊ लाख सहा हजार ६८७ रुपयांच्या शिलकीचा दाखवण्यात आला असून, महसुली तूट भरून काढण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते केंद्र असल्याने येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा कायापालट करण्यासाठी विशेष निधीची तरतूद आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली जाणार आहेत, तसेच प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करून पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे मोठे प्रकल्प हाती घेतले जातील. पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यासाठी भांडवली खर्चातून मोठी तरतूद करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या आणि वर्षभर येणाऱ्या लाखो पर्यटकांची गरज लक्षात घेता शहराला अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे नूतनीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी आणि त्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्याबाबत सभेत सखोल चर्चा करण्यात आली. महाबळेश्वरच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी ‘प्लॅस्टिकमुक्त महाबळेश्वर’ मोहिमेला अधिक बळ दिले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल. ‘माझी वसुंधरा’ योजनेंतर्गत शहरातील जुन्या वृक्षांचे जतन आणि मोठ्या प्रमाणावर नवीन वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहरातील सर्व नवीन मिळकतींना तातडीने कर आकारणी करणे, मिळकत कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबवणे, प्रशासकीय खर्चात काटकसर करून महसुली तूट कमी करणे, तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती रोहित ढेबे यांनी उत्पन्नवाढीबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावास स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती ॲड. संजय बाळकृष्ण जंगम यांनी अनुमोदन दिले, तर विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी, नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षाभेद विसरून एकत्रित प्रयत्न करावेत, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष नासिर मुलाणी, नगरसेवक अफजल सुतार, संतोष शिंदे, राहुल पिसाळ, संतोष आखाडे, कुमार शिंदे, राजू नालबंद, नगरसेविका विद्या बावळेकर, विमल बिरामने, स्मिता पाटील, नीता झाडे, शबाना मानकर, रेश्मा ढेबे, पल्लवी कोंढाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com