सुरूर महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून नागरिक संतप्त; रविवारी ‘महाबळेश्वर बंद’, सोमवारी प्रशासनाला निवेदन
रस्त्याच्या कामासाठी उद्या महाबळेश्वर बंद
सुरूर- पोलादपूर मार्गाचे काम रखडले; सोमवारी देणार प्रशासनाला निवेदन
महाबळेश्वर, ता. ६ ः सुरूर ते पोलादपूर राज्य महामार्गाच्या कामाला वारंवार मागणी करूनही गती मिळत नसल्याने महाबळेश्वरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच्या निषेधार्थ रविवारी (ता. आठ) महिला दिन व रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनानंतरही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही, तर बेमुदत शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या सुरूर- पोलादपूर मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आला. डिसेंबर २०२४ पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. या मार्गाचे सिमेंटीकरण सुरू असतानाच पसरणी घाटात मोऱ्या व संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ही कामे अपूर्ण असतानाच ठेकेदाराने पाचगणी- महाबळेश्वर या टप्प्याचे काम सुरू केले. अनेक महिन्यांपासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यानचा सुमारे २० किलोमीटरचा रस्त्याची बिकट अवस्था आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला, खड्ड्यांनी भरलेला असून, कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक, प्रवासी, तसेच पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अनेकांनी हा मार्ग टाळून पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने त्यांचे हाल होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सुरूर- पोलादपूर रस्त्यासह शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी पेटीट ग्रंथालयाच्या मैदानावर पक्षनिरपेक्ष नागरिक बैठक बोलावली होती.
बैठकीस नगराध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, नगरसेवक संतोष शिंदे, अफजल सुतार, ॲड. संजय जंगम, नगरसेविका स्मिता पाटील, विशाल तोष्णीवाल, संदीप साळुंखे, रमेशभाई कौल, रमेश पलोड, गिरीश नायडू, नदीम शारवान, समीर सुतार, अतुल सलागरे, वृषाली डोईफोडे, लीलाताई शिंदे, यशवंत घाडगे, शंकर ढेबे, सविता पलोड, अमित ढेबे, उषाताई ओंबळे, राजश्री भिसे, मनीष तेजानी, रिचर्ड डायस, महेश गुजर, हेमंत साळवी, विजय नायडू, अंकित पलोड, योगेश बावळेकर, मेघा चोरगे, ज्योती वागदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत सोमवारी (ता. नऊ) नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, वन विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस ठाणे येथील प्रमुख अधिकाऱ्यांना मोर्चाने जाऊन नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
---------------------------
चौकट :
मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा
या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही, तर महाबळेश्वरचे नागरिक मंत्रालयासमोर काळे झेंडे व निषेध फलक घेऊन आंदोलन करतील, असा इशारा बैठकीचे निमंत्रक राजेश कुंभारदरे यांनी दिला, तसेच या आंदोलनात पाचगणी व वाई शहरांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------
05035
महाबळेश्वर : येथील बैठकीत चर्चा करताना पदाधिकारी, नागरिक, व्यापारी व इतर.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

