महाबळेश्वर येथे खड्डे बुजवण्याचा दिखावा उघड; २६ जानेवारीपासून शिवसेना उबाठा गटाचा आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वरात रस्त्यांच्या दुरुस्तीचा फार्स
शिवसेनेच्या वतीने खड्डे बुजविण्याची मागणी; प्रजासत्ताकदिनी आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर, ता. १८ : पाचगणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी काँक्रिटचा वापर न करता खडी व डांबराचा वापर करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली होती. यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर रस्त्याचे काम करणाऱ्या केएनएल कंपनीने तातडीने खडी- डांबर टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली. मात्र, ही दुरुस्ती केवळ तात्पुरती आणि दिखाऊ ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू नसल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.
प्रसिद्ध वेण्णा लेककडे जाणाऱ्या मार्गावर छत्रपती प्रतापसिंह उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. शिवनेरी गार्डनसमोरील मोठमोठे खड्डे, बगीचा गार्डनजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते उखडले गेले आहेत. साज हॉटेलपासून लिंगमळा येथील सूरज जांभळे वॉशिंग सेंटरपर्यंत तसेच शहरातील अनेक ठिकाणी अर्धा फूट व त्याहून अधिक खोल खड्डे पडले असून, गेल्या चार दिवसांपासून त्यांची कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नाही.
रस्ता करणारी कंपनी आणि या कंपनीला ठेका देणारी एमएसआयडीसी यांची बेपर्वाई यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शिवसेना शहरप्रमुख राजा गुजर आणि विभागप्रमुख शंकर ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उद्यापासून (सोमवार) युद्धपातळीवर खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही, तर २६ जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी दिला आहे. संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घ्यावी, असेही त्यांनी समाज माध्यमांवर त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------------------
कामाच्या दर्जाबाबत संभ्रम
एमएसआयडीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक कामाची पाहणी करण्यासाठी प्रवास करणार असल्याने केवळ दाखविण्यासाठी काही काळ काम सुरू असल्याचा फार्स करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे महाबळेश्वरमधील रस्त्यांच्या कामाच्या पद्धती व दर्जाबाबत तीव्र संभ्रम निर्माण झाला असून, याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

