पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने आता सुरुवात केली आहे. त्यासाठीच्या १५ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. जमिनीपासून सुमारे १८ मीटर उंचीवर हा पूल असेल.

पुणे - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने आता सुरुवात केली आहे. त्यासाठीच्या १५ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. जमिनीपासून सुमारे १८ मीटर उंचीवर हा पूल असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रो मार्गावर सर्वाधिक वर्दळीचा नळस्टॉप चौक आहे. त्या चौकात गर्दीच्या वेळेत दर तासाला सुमारे १० हजार वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या चौकात वाहनांसाठी उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोमार्ग, असा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल उभारण्याची चर्चा गेल्या दहा वर्षांपासून सुरू होती. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर तेथून मेट्रो मार्ग जाणार असल्यामुळे हा डबल डेकर महामेट्रोने उभारायची तयारी दर्शविली. त्यासाठीचा निधी महापालिकेने त्यांना देण्याचे कबूल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मार्गावर पुढील वर्षी मार्च अखेर आनंदनगर ते गरवारे महाविद्यालयादरम्यान मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या १५ खांबांची उभारणी महामेट्रोने केली असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली. 

उड्डाणपुलाचा असा होणार फायदा 
नळस्टॉप चौकात सिग्नलसाठी थांबल्यावर नागरिकांना सध्या १२० सेकंद थांबावे लागते. गर्दीच्या वेळात हा वेळ आणखी वाढतो. वाहनांसाठीचा उड्डाण पूल झाल्यावर वाहनचालकांना नळस्टॉप चौकात थांबावे लागणार नाही. त्यांना थेट दशभुजा गणपती चौकापर्यंत जाता येईल. तसेच नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीही कमी होऊ शकेल, असा महामेट्रोचा होरा आहे.

असा असेल पूल 

  • कर्वे रस्त्यावर स्वातंत्र्य चौक ते एसएनडीटी (बीएसएनएल समोर) दरम्यान होणार पूल 
  • पुलाची लांबी - ५४६ मीटर, रुंदी - ६ मीटर रुंदीचे दोन मार्ग 
  • जमिनीपासून उड्डाण पुलाची उंची ८ मीटर, त्यावर ११ मीटर उंचीवर मेट्रो मार्ग
  • पुलाचा खर्च - सुमारे ५५ कोटी (महामेट्रो ३० कोटी, महापालिका २५ कोटी) 
  • पुलाचे काम पूर्ण होण्याचा कालावधी - सुमारे दोन वर्षे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahametro starts construction of double decker bridge in Pune