महापालिका उभारणार शवागार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

गरीब कुटुंबातील मृतांसाठी शवागार सुरू करण्याच्या महापालिकेच्या योजनेला दीड दशकानंतर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे नातेवाइकांना किमान पाच दिवस मृतदेह शवागारात ठेवता येणार आहे. ही सेवा मोफत असणार आहे. पहिल्या टप्प्यात चार शवपेट्या उपलब्ध होतील. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये ही योजना कार्यान्वित होईल.

पुणे - गरीब कुटुंबातील मृतांसाठी शवागार सुरू करण्याच्या महापालिकेच्या योजनेला दीड दशकानंतर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे नातेवाइकांना किमान पाच दिवस मृतदेह शवागारात ठेवता येणार आहे. ही सेवा मोफत असणार आहे. पहिल्या टप्प्यात चार शवपेट्या उपलब्ध होतील. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये ही योजना कार्यान्वित होईल.

शहरात रोज साधारपणे ५० नागरिकांचा मृत्यू होतो. त्यापैकी किमान आठ मृतदेह शवागारात ठेवले जातात. परंतु, सध्या काही खासगी हॉस्पिटल आणि ससूनमध्ये शवागाराची सोय आहे. 

खासगी हॉस्पिटलकडील शवागाराची क्षमता कमी असून, त्यांचे दरही अधिक आहेत. त्यामुळे ते सामान्यांना परवडत नसल्याचे दिसून आले. याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्याकडील रुग्णांचेच मृतदेह शवागारात ठेवतात. ससूनमधील शवागारामध्ये जागा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे गरीब कुटुंबातील मृतांना शवागाराची सुविधा मिळत नाही. अशा मृतांच्या नातेवाइकांना दोन-तीन दिवस घरीच मृतदेह ठेवावा लागतो. अशा घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे मोफत शवागार उपयुक्त ठरणार आहे.

एखाद्या मृतदेहावर एक-दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीनंतर अत्यंसंस्कार होणार असतील; तर मृतदेह शवागारात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे मृतदेह सुस्थितीत राहतो. मृतांचे नातेवाईक परदेशात राहत असतील आणि त्यांना अत्यंसंस्करासाठी ते वेळेत पोचणार नसतील, तर मृतदेह खराब होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे मृतदेह शवागारात ठेवण्याला प्राधान्य असते.

अडीच ते  तीन कोटी खर्च
शवागाराच्या सुविधेसाठी महापालिकेला प्राथमिक खर्च अडीच ते तीन कोटी रुपये असेल. त्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करावी लागणार आहे. सध्या महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही योजना लांबणीवर पडली होती. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने ही योजना अमलात येणार आहे.

सर्व घटकांतील मृतांना मोफत शवागार पुरविण्यासाठी ही योजना आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात किमान चार मृतदेह शवागारात ठेवता येतील. त्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा निर्माण करीत आहोत.
- डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, आरोग्यविभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahapalika will start a morgue for the dead of poor families

टॅग्स