आगळगाव, पांगरी मंडळात उद्या महाराजस्व अभियान
आगळगाव, पांगरी मंडलात
उद्या महाराजस्व अभियान
सर्व दाखले मिळणार एकाच छताखाली
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ५ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात न जाता गावातच सर्व दाखले मिळावेत व कामे व्हावीत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानांतर्गत शनिवारी (ता. ७) आगळगाव आणि पांगरी मंडलात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ येथील गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.
तालुक्यातील आगळगाव आणि पांगरी मंडलामध्ये शनिवारी सकाळी ९ ते ५ या दरम्यान हे शिबिर होणार आहे. प्रामुख्याने प्रस्तावित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पीएम किसान योजना, ई मोजणी तसेच महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांचा निपटारा या ठिकाणी केला जाणार आहे. या भागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

