युवकांसाठी वन-स्टॉप मार्गदर्शन

युवकांसाठी वन-स्टॉप मार्गदर्शन
Published on

युवकांना करिअर मार्गदर्शन एका क्लिकवर
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाचतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण
मुंबई, ता. २८ : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी (वन-स्टॉप) उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी उपक्रम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य विकास व नावीन्यता विभागाच्यावतीने विकसित केलेल्या या देशातील पहिल्याच अभिनव चॅटबॉटचे लोकार्पण सह्याद्री अतिथिगृह येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखाली असून ही डेमोग्राफिक ॲडव्हांटेज देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. हा एआय आधारित चॅटबॉट कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.’ यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ. अमित सैनी, संचालक सतीश सूर्यवंशी व विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात जर्मनीमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेले आयटीआय विद्यार्थी विनायक तावरे, आदित्य जाधव, अद्वैत पाटील, आशीष पसलकर, अथर्व लोहंगोंकर आणि सत्यम सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना परदेशी नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली.
तांत्रिक अडचणी दूर करणे हा उद्देश
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी योजनेचा लाभ घेताना युवकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाचतुर चॅटबॉट हा युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्हॉट्सॲपवर वापरता येईल. शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेसाठी पूर्वी नोंदणीसाठी लागणारे दोन ते तीन दिवस आता केवळ १५ मिनिटांवर आले आहेत. हा चॅटबॉट शासकीय सर्व्हरवर आधारित असून डेटा सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
------------
असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करण्याचा आमचा संकल्प आहे. एआयमुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ राज्यातील तरुणांना मिळवून देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com