चार पदाचा प्रभारपदाचा प्रभार

चार पदाचा प्रभारपदाचा प्रभार
Published on

पान ३
-------
एकाच अधिकाऱ्यावर
पशुसंवर्धन विभागाची ‘मेहरबानी’

इतर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच अप्रत्यक्षपणे प्रश्‍नचिन्ह

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : राज्यातील चार प्रादेशिक सहआयुक्तांना डावलून पशुसंवर्धन विभागाने एकाच अधिकाऱ्यावर चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्याकडे पुण्यातील शेळी-मेंढी महामंडळाच्या संचालकपदासह नागपूरस्थित दोन संस्थांचा प्रभार आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे ते नागपूर सुमारे ६७० किलोमीटर अंतर असताना इतक्या लांबून नागपूरचा कारभार ते कसा सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत असून, या निर्णयातून विभागाचा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील अविश्वासही अधोरेखित होत असल्याची चर्चा आहे.
डॉ. मुकणे हे पुणे येथील शेळी-मेंढी महामंडळाचे संचालक आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचा अतिरिक्त प्रभारही सोपविण्यात आला आहे. नागपूर मुख्यालय असलेल्या या मंडळामार्फत राज्यातील पशुपालकांसाठी विविध धोरणे निश्चित करणे, योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. अशा महत्त्वाच्या संस्थेचा कारभारही पुण्यातून पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प राबविला जात आहे. दहा लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. या प्रकल्पाची जबाबदारीही डॉ. मुकणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
याशिवाय, अतिरिक्त आयुक्त म्हणून संपूर्ण राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे संनियंत्रणही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पुण्यातील मुख्य जबाबदारी सांभाळतानाच नागपूरस्थित संस्थांच्या कामकाजावर प्रभावी लक्ष कसे ठेवले जाणार, हा प्रशासकीय प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पशुधन विकास मंडळ आणि दुग्ध विकास प्रकल्पाचा थेट संबंध पशुपालक व दुग्ध उत्पादकांच्या प्रश्नांशी आहे.
राज्यात नागपूर, अमरावती, लातूर आणि अहिल्यानगर येथे चार प्रादेशिक सहआयुक्त कार्यरत आहेत. कामाचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी जबाबदाऱ्या एकाच अधिकाऱ्याकडे केंद्रित करण्याच्या निर्णयातून इतर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चाही या पार्श्वभूमीवर सुरू आहे.

जबाबदाऱ्यांचा एकवटलेला भार
डॉ. मुकणे यांच्याकडे शेळी-मेंढी महामंडळाचे संचालकपद, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचा अतिरिक्त प्रभार, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाची जबाबदारी आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे संनियंत्रण अशा चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. यातील दोन संस्थांचे मुख्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे ६७० किलोमीटर अंतरावरून या संस्थांचा कारभार प्रभावीपणे सांभाळणे कितपत शक्य आहे, तसेच चार प्रादेशिक सहआयुक्त उपलब्ध असताना एकाच अधिकाऱ्यावर एवढा भार देण्याची गरज का भासली, याचे उत्तर पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित आहे.

सचिवांकडून प्रतिसाद नाही
दरम्यान, या संदर्भात पशुसंवर्धन खात्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सचिव डॉ. रामासामी यांनी प्रतिसाद दिला नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com