पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता चौथी (प्राथमिक) आणि सातवीची (उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. शासनमान्य शाळांमधून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर इयत्ता सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://puppssmsce.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.