
आता "वाट माझी बघतोय रिक्षावाला नाही, तर "राज्य चालवितोय रिक्षावाला' म्हणायचं!
पुणे : "कामावर जायला उशीर झायला, वाट माझी बघतोय रिक्षावाला' या गाण्यापासून ते "तीन चाकांची रिक्षा असलेले हे सरकार आहे' अशी महाविकास आघाडी सरकारव होणारी बोचरी टिका, अशा पद्धतीने हळूहळू चाललेला रिक्षाचा प्रवास थेट मंत्रालयापर्यंत पोचला, एकनाथ शिंदे यांच्या रुपाने एका सर्वसामान्य रिक्षाचालकाच्या गळ्यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे साहजिकच लाखो रिक्षा चालकांचा ऊर अभिमानाने भरला आहे, त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षाही तितक्याच वाढल्या आहेत. रिक्षाचालकांच्या कष्टाची शिंदे यांना जाणीव आहे, म्हणूनच रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ, मुक्त परवाना बंद करणे व रिक्षा चालकांच्या आत्महत्या थांबविण्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे, अशी भावना रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.
कोणाच्या आनंदाच्या, तर कोणाच्या दुःखाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील अशा कित्येक प्रसंगात धावून येत त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी पोचविणारी हमखास व्यक्ती म्हणजे रिक्षाचालक. वेळ,काळ, प्रसंग कोणताही असला तरीही रिक्षाचालक तिथे खंबीरपणे उभा असतो. वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा टिकेचे धनी होतानाच, चांगल्या कामामुळे समाजाकडून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थापही मिळते. अशाच सर्वसामान्य रिक्षाचालकांप्रमाणे कधीकाळी रिक्षा चालवून शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणा प्रवेश करीत एकनाथ शिंदे यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या या प्रवासाचे व मुख्ममंत्रीपदी विराजमान होण्याच्या क्षणाचे हजारो रिक्षाचालकांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे. काही मोजक्या रिक्षाचालक, रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनीधींनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"एकनाथ शिंदे हे पहिल्या टप्प्यातच मुख्यमंत्री झाले असते, तर आनंद झाला असता. आताचे चित्र निर्भेळपणे आनंद मानावा असे नाही. शिंदे यांनी आपल्या पक्षाशी प्रतारणा केल्याने त्यांना पद मिळाले आहे. तरीही शिंदे यांनी आपली पुर्वीचे दिवस लक्षात घेऊन रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, रिक्षाचा मुक्त परवाना बंद करावा, शेतकरी, एसटी चालकानंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रिक्षाचालकांच्या आत्महत्या थांबवाव्यात.'' नितीन पवार, सरचिटणीस, राज्य रिक्षा संघटना कृती समिती.
" रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला, याचा नक्कीच आनंद आहे. शिंदे यांनी रिक्षाचालकांचे प्रश्न जलदगतीने सोडवावेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या पेन्शनपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंतच्या समस्या सुटू शकतील. रिक्षा चालकांना सुरक्षा कवच देण्याची गरज आहे.''
- सिद्धार्थ चव्हाण, रिक्षाचालक
"आमच्यासारख्या सर्वसामान्य रिक्षाचालकांमधीलच एकनाथ शिंदे हे देखील आहे. कष्टाच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. आता त्यांनी रिक्षाचालकांना फायनान्स कंपन्यांकडून होणार त्रास कमी करावा. पेट्रोल दर कमी करावेत. रिक्षाचालकांच्या अडचणी दूर करण्यास प्राधान्य द्यावे.''
- किशोर पवार, रिक्षाचालक.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धेपोटी शिंदे कार्यरत राहीले. इतके वर्ष राजकारण खेळल्यानंतर त्यांनी स्वतःचे डाव टाकत मुख्यमंत्रीपद मिळविले. असे असले तरीही सर्वसामान्य रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा प्रवास नक्कीच चांगला वाटतो.
- गौतम सवाणे, रिक्षाचालक
Web Title: Maharashtra Cm Eknath Shinde Need To Look Into Autorickshaw Drivers Problem Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..