पुणे - महाराष्ट्राच्या सहकार वारसा देशभर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील - अमित शाह

पुणे - महाराष्ट्राच्या सहकार वारसा देशभर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील - अमित शाह
Published on: 

महाराष्ट्राचा सहकार वारसा
देशभर पोहोचविणार ः अमित शहा

सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू, ‘नॅशनल हेवी’साठी दीड हजार कोटी

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात येत आहे. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी रविवारी (ता. १५) केले.
तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ, अशा कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे तसेच केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.
या वेळी शहा म्हणाले, ‘‘तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२७ मध्ये उत्पादन सुरू होईल. सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक व आर्थिक उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’
या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना लागणारी यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राची औद्योगिक क्षमता वाढण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सहकारी संस्थांनी केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता औद्योगिक उत्पादन क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
‘‘बहुराज्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच प्रशासकीय व नियामक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यालयामुळे सहकारी संस्थांच्या नोंदणीसह विविध प्रशासकीय कामकाजात सुलभता येईल. संस्थांच्या कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. सहकारी संस्थांना त्यांच्या अडचणींसाठी दूरवर जावे लागणार नाही, तर पश्चिम विभागातील संस्थांना स्थानिक पातळीवरच आवश्यक मार्गदर्शन आणि सेवा मिळू शकतील,’’ असे शहा म्हणाले.
‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभाबाबत ते म्हणाले, ‘‘सहकाराच्या तत्त्वावर आधारित परिवहन सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या सेवेत टॅक्सीचालक म्हणजेच सारथी यांचा सहभाग, मालकी हक्क आणि आर्थिक भागीदारी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये चालकांना मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध प्रकारचे कमिशन द्यावे लागते. मात्र, सहकारी तत्त्वावर आधारित भारत टॅक्सीच्या माध्यमातून सारथींना त्यांच्या सेवेवर मालकी हक्क मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.’’
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासूनचा सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा कर माफ करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांना पुन्हा उभारी घेण्यास मदत झाली आहे.’’
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ‘‘तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडसारखी महत्त्वाची सहकारी संस्था पुनरुज्जीवित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे शेकडो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि राज्यातील सहकार क्षेत्राला औद्योगिक बळ मिळेल.’’
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘‘पश्चिम विभागीय कार्यालयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील बहुराज्य सहकारी संस्थांना प्रशासकीय कामकाजासाठी मोठी मदत होणार आहे. सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुलभ व सक्षम होण्यासोबतच सहकार क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळेल. यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रासाठी अधिक समृद्धीचे दिवस येतील.’’

फोटो ओळ :
तळेगाव दाभाडे, जि. पुणे : नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन आणि विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) झाले.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.