

पावसाची वाट पाहता पाहता पिकांनी टाकल्या माना
शिवारावर चिंतेचे ढग; कुठे ९२ टक्के पेरणी, कुठे २० टक्के, तरी सर्वत्र पावसाचीच आस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : जिल्ह्यात खरिपाची पेरणी पूर्णत्वाकडे जात असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सांगोल्यात ९२ टक्के, मोहोळमध्ये ९० टक्के पेरणी झाली असली तरी पिके माना टाकू लागली आहेत. अक्कलकोटमध्ये पिकांची वाढ खुंटली असून करमाळ्यात केवळ ४४.४ टक्के पेरणी झाली आहे. माढ्यात तर अवघ्या २० टक्के क्षेत्रावर झालेली पेरणीही पावसाअभावी वाया गेली आहे. उत्तर सोलापुरात १६ हजार ८१२ हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले असून दक्षिण सोलापुरात ७५ ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पंढरपूरमध्ये वीर व उजनीच्या पाण्यामुळे पिकांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.
सांगोला तालुक्यात खरिपाच्या सरासरी ३० हजार ७३५ हेक्टर क्षेत्रापैकी २८ हजार २६२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सुरुवातीच्या ओलीवर चांगली उगवण झाल्यानंतर आता पावसाअभावी कोवळी पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनची १ हजार ४५७ हेक्टरवर पेरणी झाली असून त्यालाही दमदार पावसाची गरज आहे.
मंगळवेढ्यात जुलैअखेर केवळ २२ टक्के असलेल्या पेरणीला ऑगस्टच्या पंधरवड्यातील हलक्या पावसाने गती मिळाली. बाजरी, तूर, मका, कांदा व सूर्यफूल या पिकांची पेरणी झाली असली तरी आता शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उजनी कालव्यालगतची पिके तग धरून असली तरी जिरायती भागाची अवस्था बिकट आहे. मोहोळमध्ये सुमारे ९० टक्के पेरणी झाली आहे. जून-जुलैमध्ये १३० मिलिमीटर म्हणजे ७४ टक्के पाऊस झाला; मात्र विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ करणारा मोठा पाऊस झालेला नाही. मका, तूर, उडीद आणि सोयाबीनची पिके पावसाअभावी संकटात असून चाऱ्याची टंचाईही जाणवत आहे.
अक्कलकोटमध्ये ६२.१ टक्के पेरणी झाली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. तुरीची वाढ चार फुटांपेक्षा अधिक अपेक्षित असताना अनेक ठिकाणी ती सहा इंच ते एक फुटावरच थांबली आहे. उत्तर भागात पिके हिरवी असली तरी वाढ खुंटली असून दक्षिण भागात पिके सुकू लागली आहेत. माढ्यात २४ हजार ५६१ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ ४ हजार ८६७ हेक्टरवर पेरणी झाली. अपुऱ्या ओलीवर केलेली पेरणी पावसाअभावी जळून गेली आहे. उजनीच्या पाण्यामुळे नदीकाठच्या उसाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे अनेक पिके पाण्याविना आहेत.
करमाळ्यात सरासरी २७ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार १७५ हेक्टरवर म्हणजेच ४४.४ टक्के पेरणी झाली आहे. मूग, उडीद व बाजरीच्या पेरणीत घट झाली असून अपुऱ्या पावसामुळे मका, उडीद व कांद्याच्या उगवणीवर परिणाम झाला आहे. पंढरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी वीर व उजनी धरणातून मिळणाऱ्या पाण्यामुळे खरीप पिके, ऊस व फळबागांची स्थिती सध्या समाधानकारक आहे. सुमारे ४० हजार एकरवर खरीप पिके घेण्यात आली आहेत.
उत्तर सोलापुरात १६ हजार ८१२ हेक्टरवरील सोयाबीन पावसाअभावी माना टाकू लागले आहे. विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. मात्र सीना नदीकाठच्या ५ हजार ६८३ हेक्टरवरील उसाला उजनीच्या पाण्यामुळे तूर्तास दिलासा आहे. दक्षिण सोलापुरात दीड महिन्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने तूर, मका, उडीद, मूग व सोयाबीनची वाढ खुंटली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ७५ ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले असून सरसकट पंचनामे व मदतीची मागणी होत आहे.
बार्शी तालुक्यातही सोयाबीन, तूर, उडीद व मूग पिके धोक्यात आली आहेत. पश्चिम भागातील वैराग, खांडवी, यावली, शेंद्री, उपळाई व सुर्डी परिसरात सोयाबीन पिवळे पडून मान टाकू लागले आहे. पूर्वेकडील पांगरी भागात मात्र तुलनेने चांगला पाऊस झाल्याने स्थिती समाधानकारक आहे.
चौकट...
पिके वाचविण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला
पाण्याची उपलब्धता किंवा ठिबक सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावे. पीक तगवण्यासाठी ‘पोटॅशियम नायट्रेट’ आणि ‘१३:०:४५’ खत प्रत्येकी ५० ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून वापरण्याचे आवाहन कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी केले आहे.
चौकट...
जिल्ह्यातील पिकांचे विदारक चित्र
सांगोला : ९२ टक्के पेरणी; पिके माना टाकू लागली
मोहोळ : ९० टक्के पेरणी; चारा टंचाईचे संकट
अक्कलकोट : ६२.१ टक्के पेरणी; पिकांची वाढ खुंटली
माढा : केवळ २० टक्के पेरणी; पिके जळून गेली
करमाळा : ४४.४ टक्के पेरणी; खरीप धोक्यात
उत्तर सोलापूर : १६,८१२ हेक्टरवरील सोयाबीन संकटात
दक्षिण सोलापूर : ७५ ते ८० टक्के पिकांचे नुकसान
बार्शी : पश्चिम भागात सोयाबीन पिवळे; पांगरीत स्थिती तुलनेने चांगली
पंढरपूर : उजनी-वीरच्या पाण्यामुळे पिकांना तूर्तास दिलासा
मंगळवेढा : पेरणीला गती; जिरायती क्षेत्राला दमदार पावसाची प्रतीक्षा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.