

मदत व पुनर्वसनच्या
अतिरिक्त मुख्य सचिव रजेवर
ऐन आपत्तीत महसूल विभागाच्या सचिवांकडे कार्यभार
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या असून, लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. असे असताना, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल सोमवारपासून (ता. १९) रजेवर जाणार आहेत.
त्यांचा कार्यभार महसूल विभागाच्या अपील विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्यातील ९० टक्के दुष्काळी भागातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी दुष्काळ निवारणाची कामे करणे, विविध विभागांशी समन्वय साधणे आदी कामांना महत्त्व आले आहे. अशा परिस्थितीत विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव रजेवर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुष्काळी भागातील पंचनामे पूर्ण झाले असून, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर सात दिवसांत मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत अद्याप आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणावरून वरिष्ठ पातळीवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. सिंगल या कौटुंबिक कारणास्तव रजेवर जात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या रजेचे खरे कारण वेगळे असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा एकत्रित प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी सिंगल यांच्यावर होती. मात्र, हा प्रस्ताव वेळेत पाठविण्यात आला नसल्याची माहिती लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला देण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारला टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान, एकाच आठवड्यात दोन प्रस्ताव पाठविल्याचे सांगत सारवासारव करण्यात आली होती.
यंदा दुष्काळी पंचनामे वेगाने करण्यात आले. मात्र, दुष्काळाचे निकष लागू करण्यातील गोंधळ आणि मदतीचा प्रस्ताव यावरून अद्याप गोंधळ सुरू आहे. मदतीचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडे सादर होईल आणि तेथून निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा प्रस्ताव अद्याप पाठविण्यात आलेला नसल्याने राज्य सरकारला पाच हजार रुपयांचा अग्रीम जाहीर करावा लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.