

दुष्काळाची दाहकता; शेतकऱ्यांनी मांडला समस्यांचा डोंगर
वस्तुनिष्ठ अहवाल देणार असल्याचे सांगून केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना धीर
ॲग्रोवन वृत्तसेवा
बीड/धाराशिव : पावसाच्या दीर्घ खंडामुळे मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत आहेत. सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान, वाळलेल्या द्राक्षबागा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पेरणीसाठी केलेला खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील ७ लाख ४२ हजार १६३ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, १ हजार ३५३ गावांतील सुमारे ८ लाख २२ हजार ३६० शेतकरी नुकसानीने प्रभावित झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातही दुष्काळाचे भीषण वास्तव केंद्रीय पथकाच्या पाहणीत समोर आले. प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे सांगत पथकाने शेतकऱ्यांना धीर दिला.
६५ दिवसांपासून पावसाचा थेंब नाही
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे गेल्या ६५ दिवसांपासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. केंद्रीय पथकाने शेतकरी देवीदास भानदास यांच्या दोन हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. चाऱ्याची किंमत चार हजार रुपये प्रति टन झाल्याने पशुपालकांवरील आर्थिक भार वाढला आहे. काही ठिकाणी सुमारे ४० किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. गेल्या वर्षी गावातील सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. मात्र, मदत मिळाली नसल्याने यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सुमारे ४० टक्क्यांवर आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बीड तालुक्यातील मोरगाव येथे दराडे वस्तीवरील पाझर तलाव, परिसरातील विहिरी आणि खंडाळा तलावाची पाहणी करण्यात आली. प्रभू दराडे यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी, उन्हाळ्यातील उपलब्धता आणि पाण्याच्या उपशामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती पथकाने घेतली. मोरगावचे सरपंच लिंबाजी जाधव यांनी जलजीवन मिशन व पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याची समस्या मांडली. शेतकरी रमेश विश्वनाथ कोकाटे यांच्या गट क्रमांक ३१/२ मधील सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
मोरगाव येथील बाबासाहेब चोखामार यांच्या गट क्रमांक २६१ मधील दोन एकर सोयाबीनची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना यंदा एकरी जेमतेम ५० किलो उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी सहाय्यकांनी दिली. गावातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.
सोयाबीनचे उत्पादन घटले; द्राक्षबागा वाळल्या
बीड जिल्ह्यातील दाशखेड येथे सोयाबीन वाळवत असलेल्या रेखा जयंत कोकाटे यांच्याशी पथकाने संवाद साधला. गेल्या वर्षी ३० पोती सोयाबीन झाले होते; यंदा दीड-दोन एकरांत जेमतेम ४० किलो उत्पादन मिळेल, अशी स्थिती आहे.
सुधाकर नवनाथ ठोंबरे यांनी तीन एकरांत सोयाबीनची पेरणी केली; मात्र, जेमतेम दीड ते दोन क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. बबनराव ठोंबरे यांच्या अडीच एकरांतील सोयाबीनमधून केवळ ६० ते ७० किलो उत्पादन मिळेल, अशी स्थिती आहे. शेततळ्यांसाठी ५० हजार रुपये अनुदान आणि फळबागांसाठी हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन पथकाने शनिवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात पीकस्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चारा उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी परिस्थितीचे सादरीकरण केले. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मिलिमीटर असून, यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान ३५६ मिलिमीटर पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीच्या ६२.८९ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या १८.४ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ४१.६ टक्के पाऊस झाला. पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे.
सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी ४१० किलो
पीक कापणी प्रयोगांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, सोयाबीनचे मागील पाच वर्षांतील सरासरी उत्पादन हेक्टरी १ हजार ५३४.२ किलो होते. यंदा उपलब्ध प्रयोगांनुसार उत्पादन हेक्टरी ४१० किलो नोंदविण्यात आले आहे.
८ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांचे ३ हजार १३२ उद्दिष्ट असताना ९५७ प्रयोग पूर्ण झाले होते. सोयाबीनच्या ५७६ नियोजित प्रयोगांपैकी ३१० प्रयोग पूर्ण झाले. याशिवाय बाजरीचे १७४, मूगाचे ३११, उडदाचे १२२ आणि मक्याचे २९ प्रयोग पूर्ण झाले होते. कापूस व तूर पिकांचे प्रयोग प्रलंबित होते. प्रयोग वेळेत पूर्ण करून योग्य पर्यवेक्षण करावे, शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा आणि नोंदविलेल्या उत्पादनाची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या.
केवळ ४७ दिवस पुरेल एवढाच चारा
बीड जिल्ह्यातील जनावरांसाठी उपलब्ध चारा सध्याच्या गरजेनुसार सरासरी ४७ दिवस पुरेल, असा अंदाज आहे. शिरूर कासार तालुक्यातील चारा केवळ ८ दिवस, गेवराई तालुक्यात १९.६ दिवस, तर आष्टी तालुक्यात सुमारे २२.४ दिवस पुरेल, अशी स्थिती आहे.
धाराशिवमध्ये दुष्काळाची तीव्रता
धाराशिव जिल्ह्यातील हाडोंग्री (ता. भूम) येथील शेतकरी सुधीर क्षीरसागर यांनी पथकासमोर दुष्काळाचे वास्तव मांडले. “या दुष्काळाने सगळे हिरावून घेतले. पेरणीसाठी केलेला खर्चही निघणार नाही. सोयाबीनची काढणी करण्यासाठीही पैसे नाहीत. दहा जनावरांसाठी खायला चारा नाही,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. खानापूर (ता. वाशी) येथील दिगंबर नकाते यांनी द्राक्षबागेसाठी झालेला खर्च आणि पाण्याअभावी बाग वाचविण्यासाठी करावी लागणारी धडपड मांडली.
केंद्रीय पथकाने शनिवारी (ता. १०) धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी पाहणी केली. करजखेडा (ता. धाराशिव) येथे पिकांचे नुकसान, पाणी आणि चाऱ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. मागील दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि यंदा दुष्काळामुळे पुन्हा संकट ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक असून, पाणीटंचाईच्या झळाही बसत आहेत. शेतीवरील खर्च वाया गेला आणि कर्जाचा भार वाढला असून, आता पाणी व चाऱ्याची चिंता सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पथकात नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. साक्षी भदोरिया यांचा समावेश होता. पथकासमवेत जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर, कृषी सहसंचालक महेश तीर्थकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वाढत्या गुन्हेगारीकडेही वेधले लक्ष
दुष्काळामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, खायला काही नसल्यास दुसऱ्याच्या ताटातील हिरावून घेतल्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे हाडोंग्री येथील शेतकऱ्यांनी सांगितले. चारा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर किमान चारा तरी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. .
शेतकऱ्यांना विशेष मदतीची गरज
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शेतकरी कुटुंबांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
आमदारांची टीका, खासदारांचा सल्ला
सरकारला केवळ इव्हेंट करण्याची सवय लागल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावरून केली. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असताना केवळ पाहणी आणि दौऱ्यांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पाहणी व पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता मदत दिली जाते; मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यास उशीर का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोट
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत. दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करा.
— मुक्तानंद अग्रवाल, केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.