

दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; अमरावती विभागाच्या दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या विविध मागण्या
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : ‘‘एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडला असून, शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन राहील. मदतीसाठी शासन, एनडीआरएफ आणि पीकविमा यंत्रणेतून आवश्यक कार्यवाही केली जाईल. अधिकारी व प्रशासनाने सतर्क राहून शेतकऱ्यांची कामे मार्गी लावावीत,’’ असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी (ता. २०) सांगितले. शेतकऱ्यांना सध्या आधार देण्याची गरज असून, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या समिती सभागृहात अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री भरणे होते. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत सादरीकरण केले.
कृषिमंत्री भरणे यांनी शासनाने नुकतीच ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे सांगितले. या योजनेच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाण्यांबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने अमरावती विभागात ७५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देण्याची असून, प्रशासनाने त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी केली. पावसाच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांचे नुकसान झाले असून, काही भागांत सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नसल्याचे सांगण्यात आले. संत्रा बागांमध्ये फळगळ होत असल्याने फळबागा वाचविण्याचे आव्हान निर्माण झाल्याचेही लोकप्रतिनिधींनी नमूद केले.
पावसात दीर्घ खंड पडल्याने आगामी रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.
प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करा
उपग्रहाच्या आकडेवारीच्या आधारे नुकसान ठरविण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. पीकविमा योजनेतील २५ टक्के अग्रीम रकमेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, २.५ मिलिमीटर पावसाचा निकष बदलावा आणि तालुका घटकाऐवजी महसूल मंडल हा घटक गृहीत धरावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार नितीन देशमुख यांनी पावसाची ५० टक्के आकडेवारी दाखविणे वस्तुस्थितीला धरून ठरणार नसल्याचे सांगितले. दुष्काळ जाहीर करणार असल्यास मदतीचे स्वरूपही स्पष्ट करावे. कोणतीही अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट ६० हजार रुपये आणि मजुरांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अधिक क्षमतेचे वीज रोहित्र बसविण्याची मागणीही त्यांनी केली.
बियाण्यांच्या गुणवत्तेचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. बियाणे नापास असल्याचे अहवाल विक्रीपूर्वी उपलब्ध होणे आवश्यक होते; मात्र विक्रीनंतर अहवाल आल्याचा मुद्दा आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. बोगस किंवा निकृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
चौकट :
महावितरणवर लोकप्रतिनिधींचा रोष
महावितरणच्या नादुरुस्त रोहित्रांचा प्रश्न बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याची तसेच आवश्यकतेनुसार अधिक क्षमतेची रोहित्रे बसविण्याची मागणी करण्यात आली.
चौकट :
‘फक्त नोंद नको, परिणाम दिसला पाहिजे’
महावितरणबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रारी मांडल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याची बाब कृषिमंत्री भरणे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी अधिकाऱ्यांबाबत विचारणा केली. केवळ तक्रारींची नोंद न करता त्यावर कार्यवाही करून त्याचा परिणाम दिसला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अकोल्यातील बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन सहभागी झाल्याबद्दल पालकमंत्री आकाश फुंडकर यांनीही नाराजी व्यक्त केली.
चौकट :
बैठकीत पुष्पगुच्छ, पाण्याच्या बाटल्यांनाही फाटा
नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीतील सुकामेव्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील बैठकीत साधेपणाची काळजी घेण्यात आली. सभागृहात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी पुष्पगुच्छ ठेवण्यात आले नव्हते. पाण्याच्या बाटल्यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
फोटो ओळ : अकोला : येथे झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे. शेजारी आकाश फुंडकर, अशोक उईके, संजय राठोड, इंद्रनील नाईक, रणधीर सावरकर आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.