कर्जमुक्ती बातमी

कर्जमुक्ती बातमी
Published on

शेतकऱ्यांच्या खात्यात ६२२ कोटी जमा
६५ हजार ६५६ जणांना कर्जमुक्तीचा लाभ ः याद्या टप्प्‍याटप्प्याने प्रसिद्ध होणार
अहिल्यानगर, ता.७ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६२२ कोटी ७४ लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. राज्यातील ३१ लाख कर्ज खात्यांपैकी १७ लाख खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील १ हजार ३७८ गावांतील १ लाख ३२ हजार ७३४ पात्र शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी ६५ हजार ६५६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ तडजोड योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाच्या लाभासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे, तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
राज्यातील ३१ लाख कर्ज खात्यांपैकी १७ लाख खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून, उर्वरित खात्यांमध्ये खाते क्रमांक, केवायसी किंवा अन्य तांत्रिक त्रुटी आढळल्याने माहिती पुनर्तपासणीसाठी संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार ७११ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ९२ हजार २८२ खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, तर ४१ हजार ४२९ खातेदार व्यापारी बँकांचे आहेत. पहिल्या यादीत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या साधारण १५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

इन्फो
जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी अपलोड केलेली खाती ः २ लाख ३३ हजार ७११.
पात्र झालेले शेतकरी ः १ लाख ३२ हजार ७३४
ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी ः १ लाख १४ हजार २९१
ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरी ः१८ हजार ४४०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com