सातारारोड अतिवृष्टीच्या मदतीवरून घमासान

सातारारोड अतिवृष्टीच्या मदतीवरून घमासान

Published on

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

मंत्री मकरंद पाटील यांची शशिकांत शिंदेंच्या प्रश्नावर स्पष्टीकरण; विरोधी सदस्यांकडून घोषणाबाजी

सातारारोड, ता. ६ : राज्यात आणि केंद्रातही भाजपचेच सरकार असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून आवश्यक निधी वेळेवर का मिळत नाही? त्यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा कमी पडतोय का? केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. आमदार शिंदे यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा उचलून धरत आक्रमक झालेल्या आमदार सतेज पाटील यांच्यासह विरोधी सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीतच मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत केंद्राकडून मदत आली नाही, तरी राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही मदतीपासून वंचित ठेवले नाही. आतापर्यंत १५ हजार ८१७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून, उर्वरित मदतीसाठी आम्ही २० हजार १२८ कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासन घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रस्ते व पूल वाहून गेले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत राज्याला प्रत्यक्षात मिळाली आहे का? जर ती मिळाली नसेल, तर किती निधी अजून प्रलंबित आहे, असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले, की सरकारकडून वारंवार सांगितले जाते, की केंद्राकडून आवश्यक ती मदत मिळत आहे; परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी मिळालेला दिसत नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. सभागृहात केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक करण्याचे ठराव मांडले जातात, असे असताना केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक निधी वेळेवर का मिळत नाही. राज्य सरकारचा पाठपुरावा कमी पडतोय का? की केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. तसे असेल, तर हे निषेधार्ह आहे. आमदार शिंदे यांच्या या मुद्द्याला उचलून धरत आमदार सतेज पाटील यांनी केंद्राकडून मदत आली नाही, हे मंत्र्यांनी जाहीर करावे, असे म्हणत त्यांच्यासह विरोधी सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, आमदार शिंदे यांच्या प्रश्नावरील उत्तरात मंत्री मकरंद पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंत एक कोटी दोन लाख ३४ हजार ८६० शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर एवढ्या क्षेत्रासाठी एकूण १५ हजार ८१७ कोटींची मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित मदतीसाठी आम्ही २० हजार १२८ कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासन घेत आहे.’’
केंद्राकडे आपण १७ नोव्हेंबर २०२५ रोजी अहवाल पाठवला, चार व पाच नोव्हेंबरला पहिले पथक अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी पाहणीसाठी आले. त्यानंतर ११ व १२ फेब्रुवारी रोजी दुसरे पथक येऊन गेले. मदतीसाठी आपण २९ हजार ७८१ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. केंद्राची मदत येणारच आहे, ती मदत लवकरात लवकर येईल; परंतु राज्य सरकार काही थांबलेले नाही, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com