पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव

पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव
Published on

माळशिरस, ता. १० : विजेच्या लपंडावामुळे पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरणने मागील तीन दिवसांत तीन तासही शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत केला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा केला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
महावितरणची माळशिरस परिसरात या आठवड्यात रात्रीचे शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे नियोजित वेळापत्रक होते. हे वेळापत्रक निश्‍चित करतानाच त्यांनी आठ तासांऐवजी सहा तासांचे आठवडाभरासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र हे वेळापत्रक सुरू होताच मागील तीन दिवसांत एकही दिवस सहा तासांचे ठरल्याप्रमाणे वेळापत्रक महावितरणला पाळता आले नाही. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी खरिपातील पिके कशीबशी जगण्याकरिता अंधारातदेखील विहिरी बाऱ्यावर जाऊन विजेची वाट पाहत बसत आहेत. असे असताना मागील तीन दिवसांत पहिल्या दिवशी वीजपुरवठा नऊ वाजता फक्त एक तास सुरू होता. दुसऱ्या दिवशी एक तास ३५ मिनिटे व तिसऱ्या दिवशी केवळ ४५ मिनिटांत वीजपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे तीन दिवसांत शेतकऱ्यांना ‘शेताच्या वाफ्यांपर्यंत पाणी जाईपर्यंतच वीजपुरवठा बंद’ अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत होती. यामुळे शेतकरी अत्यंत संतप्त झाले असून शासन व महावितरण कंपनीने याबाबत त्वरित सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत, अन्यथा याविरोधात मोठे आंदोलन केले जाईल, असे शेतकरी अमोल कामठे यांनी सांगितले. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

नवे वेळापत्रकही कोलमडले
शेतीसाठी महावितरणने दिवसभरात दोन फिडरला सकाळी सहा ते बारा व दुपारी बारा ते संध्याकाळी सहा अशा प्रकारचे वेळापत्रक रात्री उशिरा जाहीर केले होते. यामुळे आता दिवसा तरी त्या ठरलेल्या सहा तासांत वेळेत वीजपुरवठा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. मात्र गुरुवारी (ता.१०) दुपारी १२ पासून भुलेश्‍वर फिडर परिसरात वीजपुरवठा सुरू झाला नाही. यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com