महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प जोरात

धोंडिबा कुंभार
मंगळवार, 22 मे 2018

19 प्रकारची पिके, शेकडो वाण व 150 पेक्षा अधिक वनस्पतींचे संवर्धन

19 प्रकारची पिके, शेकडो वाण व 150 पेक्षा अधिक वनस्पतींचे संवर्धन
पिरंगुट - चुरमुरे करायचे झाले तर आजरा तालुक्‍यातील हावळा उपयोगाचा. जावई खूष करायला जव्हारमधील शेतकरी जावयाची गुंडी या वाणाला राखून ठेवतात. याशिवाय विदर्भातील लुचई, आंबेमोहोर, चिमणसाळ, नजर (पिकाचा रंग काळसर), कोलम, जीरवेल, दोडकी आदी भाताच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आयसर, पुणे यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र जनुक कोष’ या अभिनव प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील एकोणीस प्रकारच्या पिकांच्या शेकडो वाणांचे आणि दीडशेहून अधिक उपयोगी वनस्पतींचे संवर्धन केले जात आहे. त्यात एकट्या भात पिकाच्या एकशे चार वाणांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाने या प्रकल्पास अर्थसाह्य केलेले आहे. 

डॉ. माधव गाडगीळ यांच्या पुढाकाराने आखणी केलेल्या या प्रकल्पात पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्र; तसेच इतर २० संस्थांनी सहभाग घेतला आहे. पीक वाण विविधता विषयअंतर्गत तूर, मूग, लाख/लाखोडी, जवस/अळशी, करडई, तीळ, वाल, मिरची, राळा, कंद, बंटी/बोटी, बडी/पडी, चवळी/चवळा आदी पिकांच्या दुर्मीळ आणि नामशेष होत चाललेल्या जुन्या वाणांना या प्रकल्पामुळे जीवदान मिळणार आहे. 

हे आहेत प्रकल्पाचे प्रमुख उद्देश
भाताच्या जुन्या वाणांच्या गुणधर्मांची शेतकऱ्यांबरोबर वैज्ञानिक पद्धतीने नोंदणी करणे, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निर्मिती करणे आणि लागवड करून त्यांचे मार्केटिंग करणे आदी प्रमुख उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याशिवाय डांगी, गौळावू, लाल कंधारी बैल; तसेच संगमनेरी शेळी, सातपुडी कोंबडी, ५० हून अधिक गोड्या पाण्यातील स्थानिक मासे प्रजाती यांचाही अभ्यास आणि संवर्धन या प्रकल्पातून केला जात आहे.

स्थानिक परिस्थितीला अनुरूप हजारो वर्षे तगून असलेला जैवसंसाधनांचा ठेवा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. लोकसहभाग व अनुभवांना प्राधान्य देणारी ही योजना आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांत कार्यरत असणाऱ्या २३ संस्था, स्थानिक शेतकरी, मासेमार, आदिवासी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम विकसित केला आहे.
- सतीश आवटे, प्रधान संशोधक

Web Title: maharashtra gene bank Project