पशुधन विमा योजना सुरु

पशुधन विमा योजना सुरु
Published on

साडेचारशे रुपयांत गायीला ७० हजाराचे विमाकवच
----
राज्यात पशुधन विमा योजना लागू; जनावरांच्या मृत्यूनंतर विमा भरपाई मिळणार
-----
अॅग्रोवन वृत्तसेवा
लातूर, धाराशिव : नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, अपघात तसेच लम्पी स्किन डिसीज, घटसर्प आदी साथीच्या आजारांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ५ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यामुळे पशुपालकांच्या जनावरांना विमा संरक्षण मिळणार आहे. यात अवघ्या साडेचारशे रुपयायात गायींसाठी ७० हजार रुपयाचे विमाकवच मिळणार आहे.
जिल्हा पशसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पशुधनाला विमा संरक्षण देऊन जनावरांचा मृत्यू झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून त्यांचे संरक्षण करणे आणि पशुपालक शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून वाचविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी नागपूरच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या (एमएलडीबी) माध्यमातून करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेतून योजनेसाठी अॅग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी ऑफ इंडिया (एआयसी) या कंपनीची विमाकर्ता म्हणून निवड करण्यात आल्याचेही डॉ. पडीले यांनी सांगितले. योजनेत देशी व संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाला कमाल १० पशुधनासाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. प्रतिपशुधन कमाल विमा संरक्षित रक्कम दुभत्या गाईसाठी ७० हजार रुपये, दुभत्या म्हशीसाठी ८० हजार रुपये, बैलासाठी ७० हजार रुपये, रेड्यासाठी ८० हजार रुपये, तर शेळी अथवा मेंढीसाठी ७ हजार रुपये असल्याचे डॉ. पडिले यांनी सांगितले.
---
चौकट...
----
१५ टक्के वाट्याचा विमाहप्ता
-----
पशुपालक शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार पशुधनाचा एक, दोन किंवा तीन वर्ष कालावधीसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. विमा हप्त्यापैकी लाभार्थ्यांचा वाटा केवळ १५ टक्के असून, उर्वरित ८५ टक्के हिस्सा केंद्र व राज्य शासन ६०:४० या प्रमाणात उचलणार आहे. त्यामुळे पशुपालकांवर विमा हप्त्याचा आर्थिक भार पडणार नाही. गाय व बैलासाठी एका वर्षाला ४६१ रुपये, म्हैस व रेड्यासाठी ५६० रुपये तर शेळी मेंढीसाठी ४५ ते ५० रुपये विमा हप्ता द्यावा लागणार आहे. पशुपालकाचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँक पासबुक यापैकी एका ओळखपत्रासोबत पशुधनाच्या कानातील टॅग स्पष्ट दिसणारा फोटो आणि नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करुन विमा संरक्षण घेता येणार आहे. पशुधनाचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे बंधनकारक असून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पंधरा दिवसांत विम्याची दावा रक्कम बँक खात्यात जमा करणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. दावा रक्कम जमा करण्यास विलंब झाल्यास कंपनीला १२ टक्के दराने व्याजाची अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार असल्याचे डॉ. पडिले यांनी स्पष्ट केले.

-- पूर्ण -- गाढवे --

Marathi News Esakal
www.esakal.com