महाराष्ट्र पोलिसांनी केलं ट्विट अन् वेधले सगळ्यांचेच लक्ष! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जुलै 2020

महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर आज झळकलेल्या जाहिरातीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले.

पुणे : "आपण यांना कुठे पाहिले आहे का? एक जबाबदार नागरिक, शेवटच्या लॉकडाऊन आधी दिसला होता", तुम्हाला वाटेल ही टीव्हीवरच्या बातम्यामध्ये हरवलेल्या व्यक्तीची जाहिरात आहे, हो ती जाहिरातच आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरवलेल्या एका चांगल्या, सुजाण आणि सजग नागरिकाची आहे, जो कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करतो, नेमका तोच आता दिसत नाही ! महाराष्ट्र पोलिसांनी ही भन्नाट कल्पना शोधून काढली आहे आणि तिचे नागरिकांकडून जोरदार स्वागतही केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना दिलखुलासपणे हसवित, तितकेच खोचक टोमणे मारत आणि मार्मिक पद्धतीने एखाद्या विषयाचे गांभीर्य पटवून देण्याचे काम पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन सातत्याने होते. त्यातच आता महाराष्ट्र पोलिसांनी देखील अशाच वेगळ्या धाटणीतील शब्दभांडाराचा वापर करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सरकारच्या आदेशानुसार या शहरांसह अन्य मोठ्या शहरात लॉकडाऊन करुन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे, असे असतानाही संचार मनाई आदेशाचे उल्लंघन करीत अनेक नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. वारंवार, अनेक प्रकाराद्वारे समजून सांगत, दंड आकारणे, गुन्हे दाखल करण्यापर्यंत कारवाई केली. इतकेच काय नागरिकांचे संरक्षण करताना अनेक पोलिस कोरोनाबाधित झाले, काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. तरीही नागरिक काही सुधारण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच पोलिसांकडुन वेगवेगळ्या पद्धतीने नागरीकांना समजुन सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर आज झळकलेल्या जाहिरातीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. या जाहिरातीमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या एका व्यक्तिचा फोटो वापरुन त्यावर "WANTED -जबाबदार नागरिक" असा मजकूर लिहीला आहे. पुढे "हा जबाबदार नागरिक शेवटच्या लॉकडाऊन आधी दिसला होता. हा माणुस मास्क लावतो, इतर व्यक्तिपांसुन सामाजिक अंतर पाळतो, नियमित हात धुतो, चुकीची माहिती पसरवत नाही" असा मजकूर लक्ष वेधून घेतो. त्याहीपुढे आम्ही यांचा शोध घेतोय, त्यांनी गुन्हा केला नाही, ते आदर्श नागरिक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा शोध घेतोय, तुम्हाला सापडले तर तुम्हीही त्यांच्यासारखे वागा, कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिसांना मदत करा" असे भावनिक आवाहन ही त्यांनी केले आहे. बघुयात आपण यांना शोधण्यात आणि त्यांच्यासारखे वागण्यात यशस्वी होतोय का ?

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police Tweeted about COVID 19 Precautionary Advertisement