

पुणे, ता. २७ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारी मंडळाच्या बैठकीत काही सदस्यांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर त्यावर चर्चा करण्याऐवजी त्यांनी सभात्याग केला. अध्यक्षांनी विनंती करूनदेखील त्यांनी सभेत परत यायचे नाकारले. त्यामुळे चर्चा झाली नसल्याने हा अविश्वास ठराव वैध नसल्याचा दावा ‘मसाप’चे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष निफाडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडल्याने त्यांना पुढील कामकाज करण्याचा अधिकार नसल्याचा दावा ठराव मांडणाऱ्या सदस्यांनी केला. निफाडकर यांनी हा दावा फेटाळून लावत पुढील बैठकीत ठरावावर चर्चा होईपर्यंत तो वैध नसल्याचे सांगितले.
निफाडकर म्हणाले, ‘‘अविश्वास ठरावात मांडण्यात आलेले मुद्दे निराधार आहेत. आयकर विवरण पत्र मुदतीत दाखल न केल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र ते यापूर्वीच दाखल झाले असून आरोप करणाऱ्या सदस्यांनी पुरेशी माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच, आम्ही तिन्ही पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही नांदी संमेलनात आमचे कार्यक्रम ठेवले नसून मानधनदेखील घेतलेले नाहीत.’’
दरम्यान, अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करणाऱ्या २१ सदस्यांपैकी एक असणारे धुळे जिल्हाप्रमुख डॉ. संजीव गिरासे यांनी आपल्याला ठरावाबाबत अंधारात ठेवून स्वाक्षरी घेतल्याचे पत्र ‘मसाप’च्या अध्यक्षांना दिले. याबाबत गिरासे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.