

लोगो झेडपी
...........
‘चाचणी’ तोंडावर; पण पुस्तके आहेत कोठे?
प्राथमिक शाळांतील स्थिती; तिसरी, चौथीसह सहावीच्या विद्यार्थ्यांना समस्या
सातारा, ता. ११ : शाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले. एवढेच नव्हे तर चाचणी परीक्षा तोंडावर आली असतानाही अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. इयत्ता तिसरी, चौथी, सहावीसह काही वर्गांची पुस्तके अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची मागणी, उपलब्धता आणि वितरण याचा ताळमेळ न साधल्याने पुस्तकांची संख्या कमी आली. त्यामुळे चाचणी परीक्षेपूर्वी तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे
समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकून राहावी आणि गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, यंदा शाळा सुरू होतानाच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. यू-डायस प्रणालीवरील विद्यार्थी संख्या, तसेच मे महिन्यात शाळांकडून घेतलेला संभाव्य पट याच्या आधारे पुस्तकांची मागणी निश्चित केली जाते. मात्र, शाळांना मागणीच्या तुलनेत सुरुवातीला केवळ ८० टक्के पुस्तके मिळाल्याने अपुऱ्या संचातून विद्यार्थ्यांना वाटप करण्याची वेळ शिक्षकांवर आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांची अपेक्षा घेऊन शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
..........
चौकट
अभ्यासक्रम बदलाची माहिती आधीपासून
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती आधीपासून असतानाही पाठ्यपुस्तकांच्या मागणीचे अचूक नियोजन शिक्षण विभागाला करता आले नाही. शाळांकडून विविध शैक्षणिक-अशैक्षणिक माहिती ऑनलाइन भरून घेण्यात तत्परता दाखविणारा शिक्षण विभाग पुस्तकांच्या मागणीचा रिव्ह्यू घेण्यात मात्र कमी पडला आहे.
.................
शिक्षण विभागाचे म्हणणे
काही शाळांमध्ये पुस्तकांची संख्या अपुरी आहे. येत्या दोन दिवसांत तालुकानिहाय रिव्ह्यू घेऊन बालभारतीला अपुऱ्या राहिलेल्या पुस्तकांची मागणी केली जाणार आहे, तसेच सद्यःस्थितीत काही शाळांमध्ये पुस्तके जादा झाली असली, तर त्या पुस्तकांची इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.