रिपब्लिक डे कॅम्पमध्ये महाराष्ट्र दुसरा

अक्षता पवार
Monday, 10 February 2020

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘रिपब्लिक डे कॅम्प’मध्ये (आरडीसी) राज्याने दुसरा क्रमांक पटकावला.

पुणे - प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘रिपब्लिक डे कॅम्प’मध्ये (आरडीसी) राज्याने दुसरा क्रमांक पटकावला. यंदा झालेल्या प्रजासत्ताक संचालनामध्ये देशातील १७ राज्यांतून आलेले राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) कॅडेट्‌स सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरडीसीसाठी एकूण २१५५ कॅडेट्‌सची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील ११६ कॅडेट्‌स महाराष्ट्रातील होते. निवड झाल्यानंतर या कॅडेट्‌सला सुमारे तीन महिने आपल्या घरापासून लांब राहावे लागते. याकाळात त्यांना सात कॅम्पच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते. पहाटे ३ वाजल्यापासूनच त्यांच्या सरावास सुरवात होते. मागील वर्षी आरडीसीमध्ये महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला होता; परंतु यंदा अथक परिश्रमानंतर राज्याच्या एनसीसी कॅडेट्‌सनी राज्याला ‘बेस्ट रनरअप’चा मान मिळवून दिला; तर पंजाबने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातील विविध भागांतून आलेल्या कॅडेट्‌सना सेनापती बापट रस्त्यावरील एनसीसी मुख्यालयात प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण पुणे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील लिमये, कर्नल विनायक चव्हाण आणि कर्नल एम. पी. एस मोर्या यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते; तसेच कर्नल जुलियन देवादोस, कर्नल अनुराग सूद, कर्नल ॲलेक्‍स मोहन, कर्नल एच. एस. खोखेर, कर्नल पी. के. रावत, कर्नल मनदीपसिंह, लेफ्टनंट कर्नल नीरज तिवारी आदी लष्करी अधिकाऱ्यांनी कॅडेट्‌सना मार्गदर्शन केले.

‘मिनी इंडिया’चे प्रतिबिंब दाखवून या शिबिरास संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, संरक्षण कर्मचारी, सैन्यदल, नौदल व हवाईदल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली व कॅडेट्‌सना मार्गदर्शन केले. 

कॅडेट्‌सनी गाजवली दिल्ली
आरडीसीसाठी यंदा राज्यातून ११६ कॅडेट्‌सची निवड करण्यात आली होती. यामध्ये ७७ मुले व ३९ मुलींचा सहभाग होता. आरडीसी पूर्व या कॅडेट्‌सनी पुण्यातून वायुसैनिक शिबिर (व्हीएससी) आणि नौसैनिक शिबिर (एनव्हीसी) याशस्वीरीत्या पूर्ण करून दिल्लीसाठीचे प्रशिक्षण घेतले.

आरडीसीचा अनुभव चांगला होता. या कॅम्पमुळे विविध राज्यांच्या कॅडेट्‌सबरोबर संस्कृतीचे आदानप्रदान झाले. त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धती शिकायला मिळाल्या.
- पूजा बांदल, एनसीसी कॅडेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra second in Republic Day Camp