दहावी-बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांपुढे पेच

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत पडले आहेत.

पुणे - शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन वर्गातील पहिले सत्र संपत आले आहे. दहावी-बारावीचा ६० ते ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत पडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात दरवर्षी १६ ते १७ लाख विद्यार्थी दहावीची, तर १४ ते १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. यात नियमित विद्यार्थ्यांबरोबरच पुर्नपरीक्षार्थींचाही सहभाग असतो. दरवर्षी नियोजित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी-मार्चदरम्यान दहावी-बारावीची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया परीक्षेपूर्वी तीन-चार महिने सुरू होते. त्यासंदर्भातील पहिले नोटिफिकेशन सप्टेंबरमध्ये काढण्यात येते. तसेच, या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रकही सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये जाहीर केले जाते. या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये सुरू होते. मात्र यंदा कोरोनामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागले. आता ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, तरी फेरपरिक्षेबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यंदा फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्य मंडळामार्फत पावले उचलली जातील. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचना विचारात घेऊन नियोजन केले जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सध्या राज्य मंडळामार्फत दहावी-बारावीच्या फेरपरीक्षांचे नियोजन सुरू असून नियमित परीक्षा कशा घ्याव्यात याची चाचपणी सुरू आहे. याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे आणि सचिव अशोक भोसले यांच्याशी संपर्क केला; मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंडळाकडून अद्यापही सूचना नाही
दरवर्षीच्या नियोजित शैक्षणिक वेळापत्रकानुसार पहिले सत्र संपत आले आहे. मात्र अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबरपर्यंत दहावी-बारावीचा ८० ते ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो. यंदा परिस्थिती वेगळी आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांबाबत राज्य मंडळाकडून कोणतीही सूचना आलेली नाही किंवा नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे खराडीतील सुंदरबाई मराठे विद्यालयाचे (माध्यमिक विभाग) मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सांगितले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांचे म्हणणे..
दहावी-बारावीच्या नियमित परीक्षांबाबत कोणत्या दृष्टीने विचार सुरू आहे, हे राज्य मंडळ आणि राज्य सरकारने जाहीर करायला हवे. त्यामुळे पालकांची काळजी मिटेल.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षांबाबत समोर येणारे पर्याय पालकांसमोर जायला हवे.
आता परीक्षेबाबत किमान माहिती देऊन जानेवारीपर्यंत निर्णयही जाहीर करावा.
परीक्षा उशिरा घ्यायला हरकत नाही, पण त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या पाहिजेत.
फेरपरीक्षा आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडायला हवा.
परीक्षेत काही बदल होणार असेल, तर ते आधीच कळविणे महत्त्वाचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has not announced any decision regarding the 10th-12th examinations